पुणे : जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून यातील जम्बो हॉस्पिटलमधील परिचारिकांनी एकत्र येऊन ‘आरोग्य दुर्गा’चे रूप साकारले़ या वेळी पीपीई किटमध्ये असलेल्या या पाच परिचारिकांनी दशभूजा अवतारात हाती वैद्यकीय साहित्य घेऊन कोरोनारूपी राक्षसाचा वध करण्याचा निर्धार व्यक्त केला़
कोरोना संसर्गामुळे कुटुंबापासून वेगळे झालेल्या व कोरोनामुक्त होण्यासाठी लढा देणाऱ्या कोरोनाबाधितांना, आपुलकी व विश्वास देऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या २०० परिचारिकांचा बुधवारी जम्बो हॉस्पिटलमध्ये महापालिकेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला़
कोरोना संकटाने सर्वत्र थैमान घातले असल्याने, माणसापासून माणूस दुरावण्याची असंख्य उदाहरणे अवतीभोवती घडली आहेत़ मात्र, कोरोना संकटांशी थेट सामना करणाऱ्या व कुठलीही भिती व चिंता मनी न बाळगता, रुग्णसेवेत झोकून देऊन दिवसरात्र काम करणाऱ्या या परिचारिकांचा अर्थात नर्सचा महापालिकेच्या सर्वच रुग्णालयात आज सन्मान केला़ काही ठिकाणी केक कापून परिचारिकांचा सत्कार झाला, तर काही ठिकाणी भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले़
दरम्यान, जागतिक परिचारिका दिनानिमित्त जम्बो हॉस्पिटलमध्ये येत्या रविवारी हॉस्पिटलमधील परिचारिकांचा चांगल्या कामाबद्दल ३ हजार रुपये पुरस्कार देऊन छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली़