जेजुरी (नीरा) : पिंगोरी येथील खाजगी वनजमिनीला लागलेल्या आगीत तीनशे एकरावरील वनजमिनीतील वनसंपदा जाळून नष्ट झाली. वनविभागाच्या सलग ९ तासांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि ही आग नियंत्रणात आली. त्यामुळे मोठी अनर्थ टळला. मात्र, तरीही या आगीत ३०० एकरामधील वनसंपदा नष्ट झाली आहे. जेजुरी कडेपठारच्या पायथ्याला पिंगोरीच्या हद्दीत रविवारी (दि.१४) अज्ञात इसमाने खासगी डोंगरास आग लावली. यावेळी वनविभागाचे अधिकारी सर्व्हेसाठी आले होते. त्यांना कडेपठारच्या बाजूला मोठा धूर दिसल्याने पोलीस पाटील राहुल शिंदे, अधिकारी व ग्रामस्थ त्याठीकाणी गेले असता येथील डोंगराला मोठी आग लागल्याचे दिसले. यावेळी कोणताही विलंब न करता प्रथम आग विझवण्यास सुरवात केली. मात्र, आगीचे स्वरुप भीषण असल्याने यंत्र व आणखी कर्मचाऱ्यांची कुमक मागविण्यात आली. ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचारी अशा सर्वांच्या जवळपास ९ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली गेली. या कामात त्यांना पिंगोरी येथील बाबा शिंदे, अमोल शिंदे, बाळासाहेब शिंदे, सागर यादव, तुषार शिंदे व जवळ राहणारे नागरिक यांनी मदत केली.
.......................
पिंगोरी गावात मोठ्या प्रमाणात खासगी संरक्षित वन जमीन आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहे. त्याच बरोबर शासकीय वनजमीन देखील मोठ्या प्रमाणात आहे. शासनाच्यावतीने यामध्ये मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्यात आले आहे. पण अशा प्रकारच्या आगीमुळे या जंगलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शासकीय पातळीवरून वन वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असले तरी लोकांकडून डोंगरांना आग लावण्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होत आहे............... शासकीय वनीकरण वाचवण्यासाठी वनविभागाने केले जीवाचे रान आगीमध्ये जेजुरी मधील शासकीय वनीकरण केलेल्या जमिनीस मोठा धोका निर्माण झाला होता. जेजुरीच्या बाजूने शासनाने नुकतेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. ही आग तिथे गेली असती तर लाखो रुपये खर्चून करण्यात आलेले वनीकरण नष्ट झाले असते. मात्र, वनपाल वाय.जे.पाचरणे व वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, कर्मचारी बाळू चव्हाण, महादेव थोरवे यांनी मोठे प्रयत्न करत या वनीकरणात जाणारी आग थोपवून धरली. त्यामुळे मोठे नुकसान टळले. वाय.जे.पाचरणे ( वनरक्षक,पुरंदर )
......... शासनस्तरावर वन वाढवण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. मात्र, काही लोकांच्या चुकांमुळे त्याची खुप मोठी किंमत मोजावी लागते आहे. काही लोक बांधावरच गवत काढण्याऐवजी ते पेटवतात आणि त्यामधून असे वनवे लागतात. लोकांनीही आता सामाजिक भान ठेवायला हवे. अन्यथा कितीही प्रयत्न केले तरी वनसंपदा वाढणार नाही. याची मोठी किंमत पुढे जावुन मोजावी लागेल. यापुढे असे वणवे लागण्यास कारणीभूत असणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल...............डोंगराला आग लावू नका असे याभागातील लोकांना वारंवार बजावले आहे. वन संपदा व तीचे महत्व काय आहे? याबाबत गावातील तरुण लोकांमध्ये जागृतही करीत आहे. मात्र तरीही लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यापुढे लोकांनी काळजी घ्यायला हवी. राहुल शिंदे (पोलीस पाटील, पिंगोरी )