परगावच्या विद्यार्थ्यांची घरी जाण्याची व्यवस्था करा : महापौर मुरलीधर मोहोळ यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:48 PM2020-04-28T17:48:39+5:302020-04-28T17:57:05+5:30
शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांच्या घरामध्ये..
पुणे : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शहरात परजिल्ह्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरामध्ये आहे. त्यांची जेवणापासून सर्व व्यवस्था करणे अडचणीचे ठरत असल्याने त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शहरातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असून संक्रमण रोखण्याकरिता मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. पालिकेला वैद्यकीय उपचारांसोबतच नागरिकांना क्वॉरंटाईन करण्याचेही काम करावे लागत आहे. शाळांमधून ठेवण्यात आलेल्या भिक्षेकरी, फिरस्ते यांच्यासह क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या हजारो नागरिकांना दररोज जेवण पुरवावे लागत आहे. शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखांच्या घरामध्ये आहे. स्पर्धा परीक्षांसह महाविद्यालयीन शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी लॉक डाऊननंतर पुण्यातच अडकून पडले आहेत.
या विद्यार्थ्यांची जेवणासह राहण्याचीही गैरसोय होत आहे. या विद्यार्थ्यांसाठी जेवण, किचन आदी व्यवस्था करणे अडचणीचे होत आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये विद्यार्थ्यांचा हा मुद्दा महापौरांनी उपस्थित केला होता. हा मुद्दा निदर्शनास आणून दिल्यानंतर पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांना गावी जाण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या.
एक आठवडा झाल्यानंतरही यावर कार्यवाही न झाल्याने महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. गावी जाण्याकरिता आवश्यक असलेली प्रक्रिया जाहिर करावी आणि विद्यार्थ्यांचा घरी जाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी महापौरांनी केली आहे. जे विद्यार्थी गावी जातील त्यांची जाताना आणि गावी गेल्यावर वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे संसर्गाची भीती राहणार नाही.