कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भरणाऱ्या महाशिवरात्रीच्या वेळी भीमाशंकर परीसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने डिंभे येथूनच कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.
श्री महाशिवारात्रीला दर वर्षी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील लाखो भाविक महाशिवरात्रीला भीमाशंकर येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या या तीर्थक्षेत्रात शुकशुकाट पहावयास मिळाला. मध्यरात्री जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते शासकीय पूजा उरकल्यानंतर हे मंदिर बंद करण्यात आले. महाशिवरात्रीमुळे येथे दर वर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतील यामुळे प्रशासनाकडून भीमाशंकर येथे तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशाने कडेकोट पालन करण्यासाठी घोडेगाव खेड पोलीस स्टेशनकडून अनेक ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. आंबेगाव तालुक्यातून भीमाशंकरकडे जाण्यासाठी डिंभे हे प्रवेशद्वार असल्याने येथपासूनच बंदोबस्तास सुरूवात झाली होती. डिंभे वाय पॉईंट, तळेघर, पालखेवाडी, भीमाशंकर एसटी स्टँड तसेच महाद्वार पर्यंत पोलीस बंदोबस्त होता. घोडेगाव पोलीस ठाण्यातर्फे ३४ पुरूष पोलीस कर्मचारी, महिला १० वाहतूक विभागाकडील ४ होमगार्ड १० आरसीसी पथक १ बाँब शोधक पथक १ व डॉग स्कॉड १ तसेच ५ पोलीस अधिकारी बंदोबस्तावर नजर ठेवून होते. एवढ्याच प्रमाणात खेड पोलीस स्टेशनच्या मार्फतही बंदोबस्त लावण्यात आला होता. गरजेनुसार या बंदोबस्तात वाढ करण्यात येणार असल्याची माहीती घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली आहे.
फोटो : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भीमाशंकर परिसरामध्ये संचारबंदी आदेशाचे पालन करण्यासाठी डिंभे येथूनच पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता.
छायाचित्र-कांताराम भवारी.