पुणे : पुणे शहरातील विविध भागांमध्ये कामगार, मजूर अजूनही अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या गावी साेडण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे पाेलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पुण्यातील डेक्कन पाेलीस स्टेशनच्या हद्दीतील शेकडाे मजूरांना आज डेक्कन पाेलिसांनी निराेप दिला. पीएमपीच्या बसेसची व्यवस्था करुन सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन त्यांना पुणे स्टेशन येथे साेडण्यात आले. यावेळी झाेन एकच्या पाेलीस उपायुक्त स्वप्ना गाेरे, डेक्कन पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक दीपक लगड उपस्थित हाेते.
जिल्हा प्रशासनाकडून शहरात विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय मजूरांसाठी त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशला जाणारी विशेष ट्रेन साेडण्यात आली हाेती. त्यानंतर आता उत्तरप्रदेशला जाण्यासाठी शनिवारी ट्रेन साेडण्यात आली. गावी जाऊ इच्छिणाऱ्या कामगारांची नाेंदणी शहरातील विविध पाेलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना गावी साेडण्याची व्यवस्था करण्यात आली.
डेक्क्न पाेलीस स्टेशनच्या हद्दीतील मजूरांना शनिवारी त्यांच्या गावी साेडण्यात आले. पाेलीस स्टेशनच्या हद्दीत या मजूरांना हॅण्ड सॅनिटायझर, साबण, मास्क, तसेच जेवण आणि पाण्याची बाटली देण्यात आली. सुरक्षित अंतर ठेवून त्यांना रांगेत उभे करण्यात आले. त्याचबराेबर पीएमपी बसमध्ये एका सीटवर एकजण असे बसवून त्यांना पुणे स्टेशनला साेडण्यात आले. स्वप्ना गाेरे म्हणाल्या, जे कामगार पुण्यात अडकले हाेते त्यांना त्यांच्या गावी साेडण्यात येत आहे. शिवाजीनगर आणि विश्रामबाग या भागातील सुमारे 400 मजूरांना घरी साेडण्यात येत आहे. आम्ही त्यांना पाणी, जेवण आणि इतर गाेष्टी देत आहाेत. टप्याटप्याने आपण इतर मजूरांना देखील त्यांच्या घरी साेडण्यात येणार आहाेत.
पाहा व्हिडीओ