लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : कोरोनाच्या काळात आर्थिक संकटाला सामोरे जावू लागलेल्या ग्रामपंचायतींना राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नवसंजीवनी मिळाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर संभाव्य उमेदवारांच्या मिळकत कराची थकबाकी जमा होऊ लागल्याने लाखो रुपये कर गोळा होऊ लागले. काही दिवसात आर्थिक संकटात सापडलेल्या कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीने तर १८ लाखापेक्षा जास्त थकबाकी जमा होताच ग्रामपंचायतीला नविन रंग देण्याचे काम हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.
पुणे-नगर महामार्गावरील वाघोली ते शिरुर पर्यंतचा भाग हा औद्योगीकरण व वाढत्या नागरिकणामुळे तालुक्याच्या राजकारणात वाघोली, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापुर, कारेगाव, रांजणगाव, शिरुर ग्रामीण, तळेगाव ढमढेरे या गावांना वेगळे राजकीय वजन असते. तालुक्याच्या राजकारणात ही गावे सत्ता केंद्रीत असल्याने या गावांमध्ये आपल्या विचारांच्या माणसांचे वजन असण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपले वजन या गावांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये वापरत असतात. त्यामुळे पुणे-नगर महामार्गावरिल ग्रामपंचायतींच्या निवडणूकांना वेगळे महत्व प्राप्त होत असतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अनेक ग्रामपंचायतींना कर वसुल करण्यात अडसर निर्माण झाला होता. त्यातच स्थानिक लोकांच्या घरपट्टी व पाणीपट्टीची मोठ्याप्रमाणात थकबाकी असल्याने अनेक ग्रामपंचातींपुढे आर्थिक संकट उभे राहिले होते. अनेक ग्रामपंचायतींना कामगारांचा पगार कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला असतानाच राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लांबलेल्या निवडणूकींचे पडघम वाजू लागल्यावर संभाव्य उमेदवारांचे ग्रामपंचायतीची थकबाकी जमा करण्याकडे रिघ लागली आहे. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीमध्ये काही दिवसातच तब्बल १८ लाख रुपये थकबाकी जमा झाली आहे. सणसवाडी ग्रामपंचायतीमध्ये दहा लाखाच्या दरम्यान थकबाकी जमा झाली असुन शिक्रापुर ग्रामपंचायतीचीही १३ लाख ७६ हजारांची वसुली झाली आहे. ग्रामपंचात निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यास अजुन मुदत असल्याने अजुनही लाखो रुपये थकबाकी ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा होण्यास मदत मिळणार आहे.
चौकट :
काही दिवसांपुर्वी आर्थिक संकटात सापडलेल्या कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीपुढे कामगारांचा पगार कसा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसात थकबाकी जमा झाल्याने ग्रामपंचायतींने तात्काळ इमारतीचे कलरचे काम काढल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
फोटो : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीचे कलरचे काम करताना कामगार.