माळेगाव: गोळीबारप्रकरणी रविराज तावरे यांच्या जबाबावरून माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना मंगळवारी (दि. ६) अटक करण्यात आली आहे. या अटकेने गावच्या राजकीय हालचाली दिसू लागल्या आहेत. माजी सरपंच तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थकांनी आज माळेगाव बंदचे आवाहन केले आहे.
जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर दि. ३१ मे रोजी संभाजीनगर माळेगाव येथे गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी प्रशांत मोरे, विनोद मोरे, रिबेल यादव व एका अल्पवयीन मुलावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, रविराज तावरे यांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. जयदीप तावरे यांच्या समर्थकांनी खोटी फिर्याद दिल्याचा दावा करीत फिर्यादीचा निषेध नोंदवण्यासाठी माळेगाव बंदचे आवाहन केले आहे. राजहंस चौक येथे सकाळी नऊ वाजता निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.या बंदमध्ये गावातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.