पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे तब्बल एक वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात घातल्यानंतर बुधवारी (दि. २८) बाहेर आले. त्यांच्या या सुटकेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात मोठे विधान केले. ‘सत्तेचा गैरवापर करून त्यांना आत टाकले होते. सत्तेचा चुकीच्या पद्धतीने असा वापर करणे योग्य नाही’, असे पवार म्हणाले.
पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित अधिवेशनात ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले की, सत्तेचा गैरवापर कसा होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत आणि काही सहकाऱ्यांची अटक आहे. कोर्टाने स्पष्ट म्हटले आहे की, ज्या व्यक्तीवरचा पहिला आरोप शंभर कोटींचा अपहार केला, असा हाेता. तो नंतर चार्जशीटवर शंभर हा आकडा नव्हे तर साडेचार कोटी म्हणून खाली आला. फायनल चार्जशीट दिले, त्यात एक कोटीचा अपहार झाल्याचे दिसत आहे. यात काहीही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
ज्या यंत्रणेने हे निर्णय घेतले, त्या यंत्रणेसंबंधी अधिक माहिती एकत्रित करून संसदेतील सहकाऱ्यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. आमच्या सहकाऱ्यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या, इतरांवर ती स्थिती येऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे, असेही पवार म्हणाले.
...त्यांचा विचार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी करायला हवा
सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तीला कारण नसताना जवळपास १३ महिने तुरुंगात डांबून ठेवले होते. आज समाधानाची गोष्ट ही आहे की, शेवटी न्यायपालिकेने न्याय दिला आणि ते बाहेर आले. पण, ही स्थिती ज्यांनी निर्माण केली, त्यांचा विचार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी करायला हवा. - शरद पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष