बारामती : शहरात एटीएम सेंटरमध्ये हातचलाखी करून ग्राहकांचे पैसे चोरी करणाऱ्या ठगास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी बारामती शहर, ग्रामीण पोलीस ठाण्यात ८ ग्राहकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, तर फसवणूकप्रकरणी ३ गुन्हे दाखल केले आहेत . पोलीस उपनिरीक्षक डी. बी. भोसले, पोलीस हवालदार तात्यासाहेब खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी प्रतीक नामदेव शिंदे (वय २०, सध्या रा. एमआयडीसी, श्री हॉस्पिटलशेजारी, बारामती, मूळ रा. सांगोला, ता. सांगोला, जि. सोलापूर) यास गुरुवारी (दि. २८) अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यास ८ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. २९ आॅक्टोबर २०१५ ला पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फसवणूकप्रकरणी माधुरी पवार, नवनाथ आटोळे, प्रीती रणदिवे, सूर्याली कांबळे, महेश निलाखे, सारिका रमेश माने यांनी गेल्या २ ते ३ महिन्यांत तक्रारी दिल्या आहेत. विशेषत: दिवाळीदरम्यान एटीएममध्ये फसवणुकीचे प्रकार वाढले होते. त्यामुळे नागरिकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी घेतली. पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. हा आरोपी महिला, खेडूत, ज्येष्ठ नागरिकांना हेरत असे. एटीएममध्ये गेल्यावर कार्ड क्रॅश झाल्यानंतर ‘हे एटीएम मशिन चालत नाही, ‘हँग ’ झाले आहे, दुसरीकडे पैसे काढा,’ असे मदत करण्याच्या बहाण्याने नाटक करीत असे. त्याचे राहणीमान ‘पॉश’ ठेवत असे. त्यामुळे त्याचा ग्राहकांना संशय येत नसे. त्याचाच फायदा घेऊन ग्राहक बाहेर पडल्यावर तो पैसे काढून घ्यायचा. जवळपास १ लाख ७ हजार रुपयांची त्याने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या पैशांचा वापर आरोपीने मौजमजेसाठी केल्याची देखील माहिती तपासात पुढे आली आहे.गुरुवारी (दि. २८) बारामतीतील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सुरुवातीला ‘तो मी नव्हेच’ असे भासवण्याचा या युवकाने प्रयत्न केला. गुन्हे शोध पथकाने पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने चोरीच्या प्रकाराची कबुली दिली.पोलीस प्रशिक्षणासाठी बारामतीत दाखल आरोपी प्रतीक शिंदे हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील सुरक्षारक्षक आहेत. पोलीस प्रशिक्षणासाठी तो बारामती येथे आला होता. यादरम्यान त्याने त्याच्या रूममध्ये राहणाऱ्या मित्राचे एटीएम चोरले होते. ते घेऊन तो एटीएममध्ये पैसे काढण्याचा बहाणा करून आत जात असे. तो सांगोला येथे वरिष्ठ महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होता, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक डी. बी. भोसले यांनी दिली.
एटीएममधील ग्राहकाला ठगविणाऱ्यास अटक
By admin | Published: January 30, 2016 3:56 AM