बारामती : शहरातील दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना पळविल्याप्रकरणी शहर पोलिसांनी युवकास अटक केली आहे. यापैकी एका अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिच्याशी आरोपीने प्रेमसंबंध निर्माण केले होते, तर दुसरी अल्पवयीन मुलगी ही त्या मुलीबरोबर शाळेत निघाली होती. तिलादेखील आरोपीने सोमवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता पळवून नेले होते. पोलिसांनी चोवीस तासांच्या आत शाळकरी मुलींसह आरोपीला पकडण्यात यश मिळविले आहे. शहर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी विश्वनाथ शिवाजी जाधव (वय १९, रा. मोतीबानगर, बारामती) याला अटक केली आहे. दोन्ही अल्पवयीन मुली सोमवारी सकाळी शाळेला निघाल्या होत्या. या वेळी विश्वनाथने दोघींचा पाठलाग केला. त्यानंतर छेडछाड करून इंदापूरच्या दिशेने नेले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान, पोलीस कर्मचारी एस. सी. ढवळे, पी. सी. सुतार, हेमलता भोंगळे या कर्मचाऱ्यांच्या पथकाला पळवून नेलेल्या मुलींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यामध्ये पोलीस पथकाला यश आले. इंदापूर तालुक्यातील लाकडी गावामध्ये आरोपीसह रस्त्यावरून जाताना दोन्ही अल्पवयीन मुली पोलिसांना सापडल्या आहेत. याप्रकरणी आरोपी जाधव यास पोलिसांनी अटक केली आहे. श्रीरामनगर येथे एका विद्यालयात पाचवी व सातवीमध्ये या दोन्ही मुली शिक्षण घेत आहेत. सातवीमध्ये असणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपीने प्रेमसंबंध निर्माण केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यातून आरोपीने मुलीला फूस लावून पळवून नेले होते, तर पाचवी इयत्तेत शिकणारी अल्पवयीन मुलगी या मुलीसमवेत शाळेत जाते. मात्र, या दोघांबरोबर कोणी तरी पाहिल्याच्या भीतीने पालक रागावतील, त्यामुळे पाचवी इयत्तेत शिकणारी मुलगीदेखील या दोघांबरोबर गेल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहेत. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला आहे का, याची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलीस उपनिरीक्षक खान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दोन्ही अल्पवयीन शाळकरी मुलींचा पाठलाग करून, छेडछाड करून आरोपीने इंदापूरच्या दिशेने नेले. जाताना हे सर्व जण पायी गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. हे तिघे जण लाकडी गावात आढळले आहेत. त्यापूर्वी आरोपीने बारामती लाकडी मार्गावरील पडक्या घरात त्या दोघींना ठेवले होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, तपासानंतर पंचनाम्यामध्ये या बाबी उघडकीस येतील, असे पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान यांनी सांगितले.
शाळकरी मुलींना पळविणाऱ्यास अटक
By admin | Published: October 07, 2015 4:06 AM