पुणे : एल्गार परिषदेमध्ये हिंदूंच्या भावना दुखावणारे वक्तव्य करण्यासोबतच भारतीय संघराज्य आणि भारताची राज्य घटना मानत नसल्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये देशद्रोहाचे कलम अंतर्भूत करुन त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी भाजपाच्या शिष्ठमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या संदर्भात शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सरचिटणीस गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, संदीप लोणकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेंद्र मानकर, तक्रारदार ऍड. प्रदीप गावडे उपस्थित होते.
माजी खासदार प्रदीप रावत म्हणाले, ‘पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद आयोजित केली होती. याचे आयोजनात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचा हात होता. शरजीलवर यापूर्वी हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. तरीही त्याला यावर्षी परिषदेत निमंत्रित करण्यात आले. त्याने अतिशय आक्षेपार्ह विधाने केली आहेत. तसेच परिषदेच्या ठिकाणी खोटा इतिहास, जातीय तेढ निर्माण करणारी, महापुरूषांचा अवमान करणारे साहित्य असणारी पुस्तककांची विक‘ी करण्यात आली. याचा सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.’ यावेळी पोलीस आयुक्तांनी कायदेशीर बाबी तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.शर्जील उस्मानीने पुण्यातील एल्गार परिषदेत केलेले वक्तव्य संतापजनक आहे. एवढे प्रक्षोभक वक्तव्य करून देखील राज्य शासन उस्मानीला पाठीशी घालत आहे. हिंदूंच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. त्याच्यावर नोंदविण्यात आलेला गुण अत्यंत साध्या पद्धतीचा आहे. जाती-धर्माचा निर्माण व्हावा हाच यामागील उद्देश आहे. राज्यघटना नाकारून त्याने भारतीय संघराज्याला आव्हान दिले आहे. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा करावा. अन्यथा, शहरांमध्ये सर्वत्र आंदोलन केले जाईल.- जगदीश मुळीक, शहराध्यक्ष, भाजपापुणेतीन वर्षांपूर्वी झालेल्या एल्गार परिषदवेळी एल्गार परिषदेनंतर झालेली दंगल सर्वांना माहिती आहे. यापूर्वीचा अनुभव वाईट असताना देखील पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी कशी दिली हा प्रश्न आहे? गुन्हा दाखल करताना साधी कलमे लावण्यात आली आहेत. त्याच्यावर देशद्रोहाचे १२४ (अ) हे कलम लावावे. राज्यघटना, संघराज्य आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. या एल्गार परिषदेमध्ये महापुरुषांची बदनामी करणारे वादग्रस्त साहित्यदेखील विक्रीस ठेवण्यात आलेले होते. त्यामुळे आयोजकांवरही कारवाई व्हायला हवी. उस्मानीला तात्काळ अटक करावी अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे केली आहे. जर कारवाई झाली नाही तर भाजपा आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल.- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे