लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणाचा सखोल तपास सुरू असताना या परीक्षेतील २०१८ च्या निकालात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचा तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, तसेच परीक्षा घेणाऱ्या जी. ए. साॅफ्टवेअरचा तत्कालीन व्यवस्थापक आश्विनकुमार यांना पुणे पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. परीक्षेतील निकालासाठी ५०० अपात्र परीक्षार्थींकडून प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये घेण्यात आल्याचे उघड झाले आहे.
सुखदेव हरी डेरे (वय ६१, रा. सुखयश निवास, संगमनेर, जि. अहमदनगर), तसेच जी. ए. साॅफ्टवेअरचा संचालक आश्विनीकुमार (४९, रा. कल्याणीनगर, बंगळुरू, कर्नाटक), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राज्य परीक्षा परिषदेचा आयुक्त तुकाराम सुपे याच्यासह शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अगोदर अटक केली आहे. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांच्या फिर्यादीवरून आणखी एक गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात पसरली असून, ही परीक्षा घेण्याची जबाबदारी बंगळुरूतील जी. ए. साॅफ्टवेअर कंपनीकडे सोपविली होती. १५ जुलै २०१८ रोजी ही परीक्षा आयोजिली होती. तिचा निकाल १२ ऑक्टोबर २०१८ रोजी लागला होता. टीईटीमध्ये उत्तीर्ण करण्यासाठी आतापर्यंत ५०० परीक्षार्थींनी दलालांमार्फत प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपये दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गैरव्यवहारातून जमा झाली असून, आरोपींनी रक्कम वाटून घेतली आहे. पोलीस निरीक्षक राजूरकर व त्यांच्या पथकाने बंगळुरू येथे जाऊन आश्विनीकुमार याला ताब्यात घेतले असून, त्याला पुण्यात आणण्यात येत आहे.
शिक्षक ते एसएससी बोर्डाचा अध्यक्ष
- अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरजवळील गुंजाळवाडी परिसरात डेरेचे घर आहे. काकडवाडी हे डेरेचे मूळ गाव आहे. त्याचे माध्यमिक शिक्षण कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक व बी. एड.चे शिक्षण संगमनेर शहरात झाले.
- बी. एड. झाल्यावर संगमनेर तालुक्यातील राजापूर गावात काही वर्षे त्याने शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर एमपीएससी परीक्षा पास होऊन सरकारी सेवेत तो रुजू झाला.
- नंदुरबार येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी, औरंगाबाद येथे शिक्षण विभाग विभागीय उपसंचालक, एसएससी बोर्डात अध्यक्ष म्हणून देखील त्याने कामकाज पाहिले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणून तो सेवानिवृत्त झाला.
डेरेंवर होती जबाबदारी
परीक्षेचे आयोजन व निकाल राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे व जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आश्विनकुमार यांच्यावर होती.
लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पत्र्याच्या गोडाऊनमध्ये
लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका व महत्त्वाची कागदपत्रे अजूनही पत्र्याच्या गोडाऊनमध्ये ठेवली जातात. त्यामुळे राज्य शासनाचे परीक्षा परिषदेकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष आणि परीक्षा परिषदेचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. परिषदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली असली तरी, सुमारे चार-पाच वर्षांपासून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही.
पेपरफुटीची दिल्लीतही घेण्यात आली गंभीर दखल
यवतमाळ : टीईटीचा पेपर फुटल्यानंतर या परीक्षेच्या आयोजनातील त्रुटींबाबत दिल्लीच्या राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेत (एनसीटीई) खल सुरू झाला आहे. या परीक्षेचे स्वरूप सुधारित करण्यासाठी एनसीटीईने फेब्रुवारीतच एका समितीचे गठन केले होते. मात्र, महाराष्ट्रातील पेपरफुटीनंतर या समितीच्या अभ्यासाला वेग आल्याचे केंद्रीय शिक्षण खात्याचे अपर सचिव डी. के. चतुर्वेदी यांनी सांगितले.
गैरव्यवहाराची व्याप्ती राज्यभरात पसरली असून, या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होऊ शकते. - अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे