बिबवेवाडी भागात गुंड माधव वाघाटे याचा खून झाला. त्यानंतर धनकवडीतील बालाजीनगर ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा करण्यात आली. शहरात कठोर निर्बंध असताना अंत्ययात्रेत वाघाटेचे साथीदार सामील झाले होते. स्मशानभूमीपर्यंत दुचाकी फेरी काढण्यात आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. वाघाटेच्या अंत्ययात्रेत सामील झालेल्या साथीदारांनी ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतर सहकारनगर पोलिसांकडून दीडशे ते दोनशेजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर वाघाटेच्या साथीदारांची धरपकड सुरू करण्यात आली.
अंत्ययात्रेत सामील झालेल्या ८० जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शहरात कोरोनाचा संसर्ग असताना निर्बंध झुगारून अंत्ययात्रेत सामील झालेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांनी पंधरा पथके तयार केली आहेत. सातारा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण पडताळण्यात येत असून साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.