लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : गुप्तधनाच्या लालसेपोटी जुन्नर वनपरिक्षेत्रातील किल्ले चावंडवर धातुशोधक यंत्रांच्या साहाय्याने जमिनीत गाडले गेलेले गुप्तधन, धातूच्या पुरातन वस्तू याची शोधाशोध करणाऱ्या युवकाला स्थानिक ग्रामस्थांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले.
विक्रम शांताराम हाडवळे (डुंबरवाडी) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी चावंड किल्ल्यावर धातुशोधक यंत्राच्या साहाय्याने गुप्तधन तसेच धातूच्या पुरातन वस्तूची शोधाशोध करत असल्याची माहिती चावंडचे पोलीस पाटील स्वरूप शेळकंदे व वनपाल शशिकांत मडके यांना स्थानिक ग्रामस्थांकडून समजली.
त्यानंतर वनकर्मचारी यांनी या युवकाला चावंड किल्ल्याच्या पायथ्याशी पकडून त्यांची चौकशी व तपासणी केली.
चौकशीदरम्यान या युवकाकडे धातुशोधक यंत्र गज, छोटी कुदळ, दोरी आदी वस्तू सापडल्या. तसेच धातूचे तुटलेले तुकडे व पुरातन नाणी आदी वस्तू सापडल्या.
या संदर्भात वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांनी सांगीतले की विक्रम शांताराम हाडवळे याचेवर किल्ले चावंड येथील राखीव वनक्षेत्र ८१ मध्ये अपप्रवेश व ऐतिहासिक वस्तूंची शोधाशोध करणे, उत्खनन करणे, वणवा लावणे, जागेची सफाई केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपवनसंरक्षक संजय कडू, उपवनसंरक्षक, सहा वनसंरक्षक, ए. एल. भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या आरोपीची पोलीस यंत्रणा तसेच पुरातत्व विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच आरोपीसमवेत काही साथीदार असल्याची शक्यता पडताळून पाहण्यात येत आहे.
फोटो : आरोपीकडून जप्त करण्यात आलेले धातुशोधक यंत्र व साहित्य.