इंदापूर : सन २०१९ मध्ये सैनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिल्लीतील न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याच्या सुनावणीस हजर न राहिल्यामुळे दिल्ली येथील न्यायालयाने कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व इतर तिघांविरुद्ध अटक वॉरंट जारी केल्यानंतर दिल्लीतील पोलिस पथक शुक्रवारी (दि. २५) रात्री इंदापुरात दाखल झाले. आज दिवसभर ते इंदापुरातच असल्याने खळबळ उडाली आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने दिलेला धनादेश न वटल्याने सैनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दावा दाखल केला होता. त्या दाव्याच्या सुनावणीला हजर न राहिल्यामुळे हे अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दि.२ डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे, अन्यथा या सर्वांना फरार घोषित करण्यात येणार आहे. हे अटक वॉरंट घेऊन दिल्लीचे पोलिस पथक शुक्रवारी रात्री इंदापुरात आले. आज दुपारपर्यंत ते इंदापूर पोलिस ठाण्यात होते. त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळ खलबते झाली. त्यानंतर हे पथक कर्मयोगी कारखान्याच्या कार्यक्षेत्राकडे गेल्याचे बोलले जात होते.
या प्रकरणाबाबत पत्रकारांनी बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी, इंदापूरचे पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, काहीच माहिती मिळाली नाही. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.