लोणी काळभोर: लोणी काळभोरमध्ये घरफोडी आणि चोऱ्या करत धुमाकूळ घालणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात हडपसर विभागातील लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून एका चारचाकीसह ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांवर घरफोडी, जबरी चोरीचे एकुण ७८ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एकावर तब्बल ६३ गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांंनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सुभाष काळे, सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर व पोलीस पथक उपस्थित होते.
या प्रकरणी लोणी काळभोर जयसिंग काळुसिंग जुनी ( वय. २८ ), सोमनाथ नामदेव घारुळे ( वय. २४, दोघेही रा. हडपसर, पुणे ) व बल्लुसिंग प्रभुसिंग टाक ( वय. २६, रा. उरुळी देवाची ) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे च्या मध्यरात्री लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंतरवाडी, हांडेवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या होत्या. तसेच ६ मे रोजी संदीप चिंचोरे हे रस्त्याने जाताना उरुळी देवाची येथे लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्या वेळी चारचाकीमधून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून त्यांचे दोन मोबाईल चोरुन नेले होते.
या तिघांकडून ७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक टिव्ही, एक डिव्हीआर, दोन मोबाईल, एक सॅन्ट्रो कार, एक दुचाकी असा एकूण साडे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे तिघेही सराईत गुन्हेगार असून जयसिंग जुनी याच्या वर ११, सोमनाथ घारुळे वर ४ तर बल्लुसिंग टाक वर ६३ गुन्हे दाखल आहेत. या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यांचेेेेकडून लोणी काळभोर व हडपसर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी ३ असे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.