पुणे : बनावट कागदपत्रांचा वापर करुन दुसर्या व्यक्तीच्या नावाने कर्ज प्रकरण करीत दुचाकी खरेदी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहकारनगर पोलिसांनी मुंबईतील एकाला अटक केली आहे.
किरणकुमार शशिकांत पेडणेकर (वय ३४, रा. नायगाव, वसई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रितेश सुभाष शिंदे (वय ३२, रा. विवेकानंदनगर, ठाणे ) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
शिंदे यांच्या मोबाईलवर कर्ज प्रकरण मंजूर झाल्याचा एक मेसेज आला होता. त्यांनी बॅंकेला तत्काळ फोन करून आपण कर्जासाठी अर्ज केला नसल्याचे सांगितले. हा प्रकार काय आहे, हे पाहण्यासाठी ते बॅंकेत पोचले. त्यावेळी त्यांच्या नावावर एका दुचाकीची नोंदणी केली असून त्यासाठीच्या कर्ज प्रकरणासाठी बॅंकेकडे अर्ज दाखल असल्याचे बॅंकेने सांगितले. त्यानंतर त्यांनी बॅंकेकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली, त्यावेळी कागदपत्रांवर त्यांचे नाव होते, परंतु छायाचित्र मात्र वेगळ्याच व्यक्तीचे होते. बॅंकेने संबंधीत व्यक्तीच्या नावाने धनादेश काढला होता. त्यामुळे फिर्यादींनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन हा प्रकार सांगितला.
दरम्यान, सहकारनगर पोलिसांनी गाडी बुक केलेल्या व्यक्तीचा शोध सुरू केला. त्यावेळी आरोपीने ती गाडी प्रितेश शिंदे नावाने बुक केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संबंधित व्यक्ती गाडीच्या शोरुमममध्ये गाडी खरेदी करण्यासाठी आली होती, त्याचवेळी फिर्यादी व पोलिसांनी तेथे जाऊन त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने त्याचे खरे नाव पेडणेकर असून त्याने अनिल नवथले, मधुकर सोनवणे यांच्याशी संगनमत करुन वेगवेगळ्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करीत, कर्ज मंजूर करून घेत दुचाकी घेतल्याचा प्रकार समोर आला. पेडणेकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नवी मुंबईत याच प्रकारचा बनावट कागदपत्राच्या आधारे दुसऱ्याच्या नावाने कर्ज घेऊन महागडे मोबाईल फोन केल्याचा गुन्हा दाखल आहे.
---------------------
आरोपींनी प्रितेश शिंदे, सुनिल यादव, सुरेंद्र यादव, के. स. चौरशीया, अमोल गायकवाड, क्लिओ डिसुझा, विजय पंडित, निपाणी शिवकुमार, रिषभ कनोजीया यांच्या नावाने मुंबई व पुणे येथे शोरुममध्ये बनावट कागदपत्रे सादर करुन, कर्जाद्वारे वाहने घेतली आहेत. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तत्काळ सहकारनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.