पुणे :बनावट कागदपत्रांद्वारे सीमकार्ड घेऊन त्याद्वारे मार्केटिंग कंपनी थाटणा-यास डेक्कन पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून विविध कंपन्यांचे १६ मोबाईल व सीम जप्त करण्यात आले. स्वप्नेश वसंत डमकोंडवार (वय ५१ रा. गुरु गणेशनगर, कोथरूड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत डेक्कन पोलिस ठाण्यातील हवालदार सचिन इनामदार यांनी फिर्याद दिली.
या गुन्ह्यात यापूर्वी रवी दिलीप मुसळे (वय ३१, रा. आळंदी देवाची) याला अटक करण्यात आली असून सिमकार्डची विक्री करणारे रिटेलर व बनावट सिमकार्ड वापरणा-यांचा पोलिस शोध घेत आहेत. डमकोंडवार याची डेक्कन जिमखाना येथे फिनसोल मार्केटिंग प्रा. लि. ही कंपनी आहे. त्यात त्याने व सिमकार्ड विक्रेते यांनी संगनमत करून दुस-या व्यक्तीच्या बनावट कागदपत्रांचा विना परवाना वापर करत सिमकार्ड घेतले. त्या सिमकार्डचा वापर बेकायदा कंपनीसाठी केला. क्रेडिट कार्ड ऑफर आणि बॅंक लोन करता हा वापर केला. त्यातून कमिशनवर बॅंकांकडून मिळणा-या आर्थिक लाभांचा फायदा घेतला.
डमकोंडवार याने मुसळेकडून बनावट सिमकार्ड घेतले. सिमकार्डद्वारे आरोपींनी कोणाला फसविले, त्यांचा वापर आरोपी कधीपासून करीत आहेत व इतर तपासासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील आर. एम. कदम यांनी केली. न्यायालयाने ते मान्य करीत आरोपीला २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.