पुणे : उधार घेतलेले पैसे मुदतीत परत दिले नाही तर पैशाचा अपहार केल्याचा आरोप करून पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी पेट्रोलपंपचालकाने दिली असता कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्यावर चालकाने ‘जा आणि मर’ असे म्हटल्यामुळे कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पेट्रोलपंपचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, फक्त ‘जा आणि मर’ हे वाक्य आरोपीकडून संतापाच्या पोटी उच्चारले गेले असावे. त्यावरून आरोपी याच्या बोलण्याने कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असे सिद्ध होत नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला. तो ग्राह्य धरीत उच्च न्यायालयाने पेट्रोलपंपचालकाला जामीन मंजूर केला.
गणेश लांडगे (रा. भोसरी) असे जामीन मंजूर केलेल्याचे नाव आहे. तेजस पालकर (रा. पिंपळगाव, ता. दौंड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. गणेश लांडगे यांच्या या धमकीमुळे तेजस याने १४ जुलैला घरी आत्महत्या केली. तेजस याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून मान्य केले होते की, त्याने पेट्रोलपंप मालक गणेश लांडगे यांच्याकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्याकरिता मालक लांडगे यांच्याकडे मुदत मागितली होती. परंतु त्यास मुदत देण्यास मालक तयार नव्हता. पैसे दिले नाही तर तेजसने पेट्रोलपंपावर अपहार केला, अशी पोलिसांत तक्रार देण्याची धमकी मालक देत होता. मानहानीच्या भीतीने त्याने आत्महत्या केली. तेजसच्या बहिणीने गणेश लांडगे याच्याविरुद्ध भोसरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली. पोलिसांनी लांडगे यास अटक करून भारतीय दंड विधान ३०६, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला.