लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चेन्नईहून मुंबईकडे जाणा-या रेल्वेतून कासवे, इग्वाना आणि बेटा फिश माशांची बेकायदा वाहतूक करणा-या दोघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.
तरुणकुमार मोहन (वय २६, रा. लेनीननगर, अंबतूर, चेन्नई) आणि श्रीनिवासन कमल (वय २०, रा. कोल्लातूर, तमिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते चेन्नईहून मुंबईला हे प्राणी घेऊन जात होते. तेथून ते परदेशात पाठवण्याचा त्यांचा डाव होता. आंतरराष्ट्रीय तस्करी यामुळे उघड झाली आहे. या तस्कारांकडे २७९ कासवे, १२०७ इग्वाना, २३० बेटा फिश आढळून आले.
रेल्वे गाड्यांमधून विनापरवाना मालाची व प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मौला सय्यद यांना सूचना देऊन रेल्वेगाड्यांवर पेट्रोलिंग करण्याकरीता सांगितले होते. गेले ८ ते १० दिवस त्या अनुषंगाने गस्त घालण्यात येत होते. पुणे ते लोणावळादरम्यान चेन्नई एलटीटी एक्स्प्रेसमधील ए-१ बोगीमधून प्रवास करणा-या दोघांकडे एकूण ४ ट्रॅव्हल बॅगा व दोन लहान बॅग होत्या. पेट्रोलिंग करणा-या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पाहणी केल्यावर त्यात कासव, इग्वाना जातीचे प्राणी व फायटर फिश मिळाले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारचा वाहतुकीचा परवाना व कागदपत्रे नसल्याने दोघांना बॅगांसह ताब्यात घेण्यात आले.
तस्करांनी सीमा शुल्क विभागाची परवानगी न घेता प्राण्यांची वाहतूक केल्याने दोघांना सीमा शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आले. तस्करांनी हे प्राणी प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवले होते. त्यांना भोके पाडली होती. पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, पोलीस निरीक्षक मौला सय्यद, सहायक निरीक्षक अंतरकर, सहायक फौजदार सुनील भोकरे, जगदीश सावंत, पोलीस हवालदार सुनील कदम, सुहास माळवदकर, पोलीस नाईक दिनेश बोरनारे, फिरोज शेख, अमरदीप साळुंके, इम्तियाज आवटी, पोलीस शिपाई नीलेश बिडकर, संदीप पवार, विक्रम मधे, माधव केंद्रे, महिला शिपाई बेबी थोरात या पथकाने ही कामगिरी केली.
प्राणी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टमध्ये
वनाधिकारी व कर्मचा-यांनी प्राण्यांची प्रजाती समजून घेण्यासाठी त्यांना बावधन येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट येथे नेले. या संस्थेतील पदाधिका-यांनी सांगितले की, ही अाफ्रिकन स्पुरेंड टॉर्टोइस जातीची कासवे आहेत. इग्नावा हा सरड्यासारखा प्राणी आहे. या तस्कारांकडून ताब्यात घेतलेले सर्व प्राणी या संस्थेत ठेवण्यात आले आहेत.