लोकमत न्यूजनेटवर्क
पुणे : मौजमजेसाठी दुचाकीची चोरी करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे.
शाहवेज शहजाद अन्सारी (वय २५, रा. शिवाजी मार्केट, कॅम्प, मूळ गाव बिजनोर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या २ लाख ८० हजार रुपयांच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
शाहवेज अन्सारी हा शहरातील एका बेकरीमध्ये काम करत होता. मौजमजेसाठी पैसे हवे असल्याने तो दुचाकी चोरून विकत होता. चोरीची दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
गुन्हे युनिट ६चे पथक गस्त घालत असताना वाहन चोरणारा संशयित कॅम्प परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला पकडले. अधिक चौकशीत त्याने वानवडी, लोणी कंद, कोंढवा, शिक्रापूर, अहमदनगरमधील तोफखाना, सुपा, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी नितीन मुंढे, मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे यांच्या पथकाने केली.