लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूर्वी शेजारी राहणा-या महिलेचे काढलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे २ लाखांची खंडणी मागणा-यास गुन्हे शाखेच्या युनिट-२ च्या पथकाने हैदराबाद येथून पकडले.
हंसराज बाबू गायकवाड (वय ३१, रा. हैदराबाद, मूळ सावरखेड, पो. घुंराळा, ता. नायगाव, जि. नांदेड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली होती. फिर्यादी आणि गायकवाड हे तीन वर्षांपूर्वी शेजारी राहायला होते. त्यांच्यात एकमेकांच्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. आरोपीने त्यांचे काही अश्लील फोटो त्यांच्या नकळत काढले होते. गेल्या एक महिन्यांपासून तो या तरुणीला २ लाख रुपये दे, नाही तर हे फोटो तुझ्या नातेवाईक, मित्रांना पाठवितो, अशी धमकी देत होता. गुन्हे शाखेच्या युनिट २ याचा समांतर तपास करताना पोलीस अंमलदार समीर पटेल यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात आरोपी हा हैदराबाद येथे असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे पथकाने हैदराबाद येथे जाऊन गायकवाड याला ताब्यात घेतले. गायकवाड याने या तरुणीला ब्लॅकमेल केल्याची कबुली दिली. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याची १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, हवालदार संजय जाधव, अस्लम पठाण, किशोर वग्गु, उत्तम तारु, गजानन सोनुने, समीर पटेल, मितेश चोरमाेले, निखिल जाधव, अरुणा शिंदे यांनी ही कामगिरी केली.