पुणे : पॉलिशसाठी दिलेले ३५ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून जात असलेल्या कारागीराला फरासखाना पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानकासमोरुन पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडले. त्यांच्याकडून २८ लाख ५२ हजार ५७१ रुपयांचे ५९८ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त केले आहेत.
मशीदुल ऊर्फ मैदुल लालचंद शेख (वय ३२, रा. भोहरी आळी, रविवार पेठ, मुळ गाव पश्चिम बंगाल) असे या कारागीराचे नाव आहे. मनोज मन्ना यांचे गोल्ड स्मिथ दुकान असून त्यांच्याकडे अनेक सराफानी पॉलिशसाठी सोन्याचे दागिने दिले होते. ते पॉलिशसाठी शेख याला दिले असताना तो ते घेऊन पळून गेला होता.
फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील व त्यांचे पथक शोध घेत असताना शेख हा दौंड रेल्वे स्टेशनजवळ थांबला असून पश्चिम बंगालला पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दौंड रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेत असताना स्टेशन येथील दुर्गामाता मंदिरासमोरील रोडवर तो थांबलेला आढळून आला. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.