ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 - संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे पंढरीला जाण्यासाठी १७ जूनला हरीनाम गजरात माउली मंदिरातून प्रस्थान होणार आहे.
आळंदी देवस्थानमध्ये पालखी सोहळा २०१७ साठीचे नियोजन पूर्व आढावा घेण्यासह पालखी सोहळ्याचे कार्यक्रम वेळापत्रक, श्रींचा नैवेद्य, मोकळा समाज, दिंड्यादिंड्यांची उतरण्याची जागा, पालखी तळ नियोजन, स्वच्छता, अधिकृत अनधिकृत दिंड्या समस्या, भाविक, वारकरी सेवा सुविधा, वाहतूक, वाहन पास, ध्वनी प्रदूषण, सोहळ्यातील धार्मिक कार्यक्रम आदींसाठी दिंडी चालक, मालक, व्यवस्थापक, प्रमुखांची बैठक प्रथमच अनेक वर्षांनंतर पंढरपूर ऐवजी आळंदी मंदिरात झाली.
या बैठकीत आळंदी देवस्थान व दिंडी प्रमुख यांचेत विविध विषयावर चर्चा होऊन श्रीचे पालखी सोहळ्यातील नियोजन, आढावा, सेवा सुविधाबाबत त्रुटी समस्या, अडचणी समजून घेत त्यावर समाधानकारक तोडगा, सूचना तसेच यापूवीर्चे चुका दुरुस्त करीत सोहळ्याच्या वैभवात वाढ करण्यास सुसंवाद साधला गेला. श्रींचे पालखी सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी काळानुरूप सोहळ्यात, दिंडीत होणारे बदल आणि दिंडी प्रमुख यांच्याकडून स्वयंसेवक म्हणून प्रभावी कामकाजाची अपेक्षा व्यक्त करीत चोपदार राजाभाऊ रंधवे यांनी यशस्वी मार्गदर्शन करीत सुसंवाद साधला.
माउली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत यावर्षी शनिवारी १७ जूनला सायंकाळी चारच्या सुमारास श्रींच्या वैभवी पालखीचे प्रस्थान होणार आहे. प्रस्थानानंतर पहिला मुक्काम आळंदी देवस्थानने नव्याने विकसित केलेल्या दर्शनबारी मंडपात जुन्या गांधी वाड्यातील जागेत होणार आहे. १८ जूनला सोहळा पुण्यनगरीकडे मार्गस्थ होणार आहे.