येथील आठवडे बैल बाजार जिल्ह्यात सर्वत्र प्रसिध्द बैल बाजार आहे.या बाजाराबरोबरच शेळी-मेंढीचा बाजार, म्हशींचा व तरकारी बाजार तसेच कडधान्य बाजार मोठा भरतो.या ठिकाणी संगमनेर, नाशिक, लासलगांव, कल्याण आदी जिल्ह्यांतून व तालुक्यातून शेतकरी व व्यापारी बैल खरेदी विक्रीसाठी येतात.या प्रसिध्द असणा-या बैल बाजारात गावठी, म्हैसुरी, खिल्लारी व पंढरपुरी बैल विक्र साठी येतात.या बैल बाजारात बैलांची आवक चांगली वाढली होती.मात्र, बैलांना उठाव कमीच होता.लांबून शेतकरी व व्यापारी आलेच नाहीत.बैलांचे भाव मात्र कमी प्रमाणात वाढले होते.गेले काही दिवसांपासून या बैल बाजारात बैलांना जास्त भाव मिळतच नाही.बैलगाडा शर्यती चालू झाल्याशिवाय बैल बाजारात आवक वाढणार नाही,असे अनेक व्यापारी व शेतक-यांनी सांगितले.आजच्या बैल बाजारात खिल्लारी बैल जोडीचे भाव ३५ ते ४० हजार रुपये तर गावठी बैलजोडीचे भाव ४० ते ४५ हजार रुपये असे होते.अनेक शेतकरी व व्यापारी वर्गांनी आपले बैल विक्रीसाठी आणले नव्हते.तर काही शेतकरीवर्ग शेतीच्या कामासाठी बैल खरेदीसाठी आले होते.शेतकरीवर्गाला लांबून बैल बाजारात आणण्यासाठी अनेक अडचणी येतात.तसेच बैल खरेदी करुन घरी जाताना चेक नाक्यावर बैल खरेदीची पावती दाखवली तरीही खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे व्यापारीवर्गाने व शेतकरीवर्गाने सांगितले.आजच्या बैल बाजारात बैलांचे व्यवहार कमी झाले असल्याची माहिती बाजार समितीचे कार्यालयीन प्रमुख प्रमोद खिल्लारी यांनी दिली.
बेल्हा(ता.जुन्नर)येथील आजच्या आठवडे बैल बाजारात बैलांची वाढलेली आवक दिसत आहे.