पुणे : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात गौरी आगमनामुळे पालेभाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, मंगळवारी सर्वच पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाडले. यामध्ये मेथी, शेपू आणि कोथिंबीरला अधिक मागणी असल्याने एका गड्डीला तब्बल ४० रुपये दर मिळाला. पावसाचा फार मोठा फटका शेती मालाला बसला आहे. मागणी अधिक आणि आवक कमी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबीरीच्या गड्डीचा दर ४० रूपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी गौरीचे आगमन झाले. बुधवारी (दि.२६) रोजी गौरी आवाहन आहे. त्यानिमित्ताने गौरीला पालेभाज्यांचा नैवैद्य केला जातो. मेथी, शेपू, कोथिंबिर या पालेभाज्यांना ग्राहकांकडून मागणी आहे. दरवर्षीच गौरीचे आगमन झाल्यानंतर भाज्यांच्या मागणीत वाढ होते. यंदा मागणी आहे. मात्र पावसामुळे आवक कमी होत असल्याने दर तेजीत आहेत. आणखी दोन दिवस पालेभाज्यांचे दर तेजीत राहणार असल्याची माहिती व्यापा-यांनी दिली. दरम्यान पालेभाज्यांसह पडवळ, घोसावळे आणि आळूच्या पानांना मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात घोसावळ्याच्या एका किलोचे दर १०० ते १२० रुपये दर मिळाला. आळूच्या पानांना १० ते १५ रुपये दर मिळाला. पावसामुळे पालेभाज्या भिजल्या आहेत. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत.
गौरी आगमनामुळे पालेभाज्यांच्या किमती कडाडल्या; मेथी,शेपू, कोथिंबीरला प्रचंड मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:31 PM
मंगळवारी सर्वच पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाडले, गड्डीला ४० रुपये भाव..
ठळक मुद्देदरवर्षीच गौरीचे आगमन झाल्यानंतर भाज्यांच्या मागणीत होते वाढ; यंदा दर तेजीत