पुणे - पक्षाच्या वर्धापनदिनासाठी म्हणून मोठी तयारी करून, प्रभागातील मतदारांना बरोबर घेऊन गेलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवकांपैकी काही जण मुंबईत पोहोचण्यापूर्वीच मेळावा संपला. सकाळी पुण्यातून निघायला उशीर व नंतर वाहतूककोंडीमुळे मुंबईत पोहोचायला उशीर असे बऱ्याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे झाले.त्यातच मेळाव्याच्या नियोजनामध्ये सकाळी लवकरच सर्व भाषणे घेण्यात आली. मेळावा सकाळी ११ वाजताच सुरू करण्यात आला. त्यामुळे तो लवकरच संपला. कार्यकर्ते रस्त्यावर असतानाच त्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे भाषण संपल्याचा निरोप मिळाला. पुण्यातून ५०० पेक्षा जास्त वाहने नेण्यात आली होती. नगरसेवकांना तशी तंबीच पक्षश्रेष्ठींनी दिली होती. आमदारांनाही तसेच सांगण्यात आले होते. चहा, नाष्टा यात बराच वेळ गेला. महिला नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील महिलांना बरोबर घेतले होते. त्यासाठी खास गाड्या करण्यात आल्या होत्या.भल्या सकाळीच निघण्याच्या सूचना असूनही सगळे आवरून निघायलाच अनेकांना बराच उशीर झाला. त्यातच वाहनांच्या संख्येमुळे मुंबई द्रुतगती मार्गावर गर्दी झाली. टोलनाक्यापासूनच वाहने संथ जात होती. काही जण मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले, मात्र प्रत्यक्ष स्थळापासून ३ किलोमीटर अंतरावरच वाहने थांबवली. तिथेच वाहनतळाची व्यवस्था केली होती. त्यामुळे चालत जातानाही विलंब झाला.पुण्याहून मोठ्या संख्येने बस येत असल्याचे समजताच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी या गाड्यांना मेळावा संपला असे सांगत उलट दिशेने परतण्याची विनंती केली. पुढे जाल तर वाहतूककोंडीत सापडाल, त्यामुळे परत पुण्याकडेच जा, असे त्यांना सांगण्यात आले. मेळावा संपल्याची माहिती या पदाधिकाºयांनाही मिळाली.
वाहतूक कोंडीमुळे पुण्यातील कार्यकर्ते मुंबईत पोहोचण्यापूर्वीच आटोपला मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 3:36 AM