बालेवाडी स्टेडियममधील सिंथेटिक ट्रॅक वर गाड्या नेण्याचा उद्दामपणा हे क्रीडापटूंची थट्टा उडविणारे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 06:38 PM2021-06-28T18:38:50+5:302021-06-28T18:38:56+5:30
ट्रॅकचे नुकसान संबंधित नेत्यांकडून वसूल करण्यात यावे व ट्रॅक पर्यंत नेत्यांच्या गाड्यांना सोडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी
पुणे: पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी परिसरात उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी काही नेते दाखल झाले होते. तेव्हा शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे क्रीडापटूंसाठी बनविल्या गेलेल्या सिंथेटिक ट्रॅक त्यांनी गाड्या नेण्याचा उद्दामपणा केला. त्यांच्या गाड्यांचा ताफा चक्क मुख्य अथलेटिक्स स्टेडियमच्या ट्रॅकवर उभा करण्यात आला होता. क्रीडापटूंच्या भावनांची थट्टा उडविणारे हे कृत्य करणाऱ्या नेत्यांचा व त्यांच्या या कृतीचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. असे निवेदन भाजपच्या वतीने क्रीडा संकुलात देण्यात आले आहे.
यावेळी गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवाडकर, राहुल कोकाटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वतःला जाणते राजे म्हणवून घेणारे राष्ट्रवादीचे नेते तसेच महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. क्रीडा संकुलातील हे ट्रॅक अतिशय कुशलतेने बनवल्या जातात. व त्यांची नियमित काळजी घ्यावी लागते. तसेच ह्या ट्रॅक विषयी क्रीडापटुंच्याच्या मनामध्ये आपुलकीची भावना असते. क्रीडापटूंच्या भावना दुखावल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या नेत्यांच्या उद्दामपणामुळे या सिंथेटिक ट्रॅक चे झालेले नुकसान हे संबंधित नेत्यांकडून वसूल करण्यात यावे व ट्रॅक पर्यंत नेत्यांच्या गाड्यांना सोडणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हावी. असे निवेदनातून नमूद केले आहे.