पुणे : दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये चढण्यास उशीर झाल्यामुळे पीएमपी चालकाकडून शिवीगाळ करण्यात आल्याची घटना समाेर आली आहे. याप्रकरणी पीएमपीने त्वरीत कारवाई करत चालकाला निलंबीत केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना पीएमपीमध्ये पुढच्या दरवाजाने चढण्याची परवानगी असते. तसेच चालक वाहकांनी दिव्यांग प्रवाशांना सर्वाेताेपरी मदत करण्याच्या सूचना पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. असे असताना पीएमपीच्या चालकाचा मुजाेरपणा समाेर आला आहे. दिव्यांग असलेल्या गणेश बाेरुडे (वय 30, रा. उत्तमनगर) यांना बसमध्ये चढण्यास उशीर झाल्याने चालकाने त्यांना शिवीगाळ केली. तसेच तेथेच उतरण्याची भाषा केली. यावेळी वाहकाने केवळ बघ्याची भूमिका घेतली. गणेश यांनी बसला हात केल्यानंतर चालकाने बस थांब्यावर न थांबवता पुढे थांबवली याबद्दल गणेश यांनी चालकाला जाब विचारला असता चालकाने शिवीगाळ करत बसमधून उतरण्यास सांगितले.
याप्रकरणी गणेश यांनी पीएमपीकडे तक्रार केल्यानंतर प्राथमिक माहितीच्या आधारे पीएमपीकडून चालकाला निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी बाेलताना पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक अजय चारठणकर म्हणाले, प्रवाशाने पीएमपीकडे तक्रार केल्यानंतर प्राथमिक माहितीच्या आधारे चालकाला निलंबित करण्यात आले आहे. दिव्यांग व्यक्तींना मदत करणे हे चालकाचे कर्तव्य आहे. तसेच प्रवाशांशी त्यांनी साैजन्याने वागायला हवे. तशा सूचना देखील चालकांना देण्यात आल्या आहेत. बुधवारच्या प्रकाराची पीएमपीने गंभीर दखल घेतली असून चालकाला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.