लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळे गुरव : राज्यातील कला व शारीरिक शिक्षक पदांना कात्री लावण्याचे कटकारस्थान शिक्षण विभागाने आदेशाद्वारे जाहीर केले़ त्याचा निषेध म्हणून पुणे जिल्ह्यातील कला व क्रीडा शिक्षकांनी सोमवारी विधान भवनासमोर आंदोलन केले.चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन या कला विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणारा कला विषय आणि शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच राष्ट्रासाठी आॅलिम्पिक पदके मिळविण्यासाठी बाळकडू मिळणाऱ्या शारीरिक शिक्षण या विषयाच्या तासिकांमध्ये कपात करणारे परिपत्रक शासनाने काढले. या तासिकांच्या कपातीमुळे विद्यार्थी संर्वगुण संपन्न होण्यापासून वाचविण्यासाठी शासनाने हे परिपत्रक रद्द करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब आवारी यांनी केले. पुणे जिल्हा कला व शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिपत्रक होळी धरणे आंदोलन करण्यात आले. त्या वेळी आवारी बोलत होते. या वेळी राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, वि. सचिव विश्वनाथ पाटोळे, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दादासाहेब ओमासे, जिल्हा समन्वय समितीचे कमलाकर डोके, श्रावण जाधव, चांगदेव पिंगळे, सुनील बोरोले, बिपीन बनकर, सतीश कवाने, सुरेश रणदिवे, अंगद गरड आदी उपस्थित होते. या वेळी शिक्षणायुक्तांनी तासिका कपात करणारे परिपत्रक रद्द करावे, राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये कार्यभारानुसार पूर्ण वेळ कला व शारीरिक शिक्षण शिक्षकाची नियुक्ती करावी़ संच मान्यतेमध्ये विशेष कलाशिक्षक स्वतंत्रपणे दर्शविण्यात यावा, उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निर्देशकाचे पथक नियुक्त करणे आदी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
कला व क्रीडा शिक्षकांचे आंदोलन
By admin | Published: May 31, 2017 2:16 AM