पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलाशिक्षण घेतलेल्या जे. जे. महाविद्यालयाच्या आवारात राज्यातील कला महाविद्यालयाच्या संचालक व अध्यापकांनी बुधवारी सकाळी आंदोलन केले व आपल्या व्यथा जाहीरपणे मांडल्या. कला संचालक राजू मिश्रा यांनी याची त्वरीत दखल घेत आंदोलकांबरोबर चर्चा केली व सरकारपर्यंत मागण्या पोहचवण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र कला महाविद्यालय संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष महेश थोरात म्हणाले, नियमीत अनुदान नाही, विद्यार्थ्यांच्या शुल्क वाढीचा प्रस्ताव प्रलंबित, विना अनुदानित संस्थांना अनुदानाची खात्री नाही. अनेक वर्ष काम करणाऱ्या कलाध्यापकांना मान्यता नाही. यामुळे राज्यातील सर्वच कला महाविद्यालयाची अवस्था खिळखिळी झाली आहे. याबाबत कलासंचालकांकडे अनेकदा मागणी करूनही ते दुर्लक्ष करत आहेत.
मुख्यमंत्री स्वत: जे.जे. महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, कलाकार आहेत. त्यामुळेच संघाने जे.जे. महाविद्यालयाच्या आवारात आंदोलन केले असे थोरात म्हणाले. प्रशासनाच्या वतीने या आंदोलनाची त्वरीत दखल घेण्यात आली. कला संचालक राजू मिश्रा यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावले. थोरात तसेच संजय सोनवणे, नितिन जाधव, भरत बोराटे, सुरेंद्र जगताप यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत मिश्रा यांनी महाविद्यालयाच्या मागण्या सांस्कृतिक मंत्ऱ्याच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले.
चित्रकलेच्या मिश्रा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परिक्षा कलामहाविद्यालयांच्या वतीने घेतल्या जात होत्या. त्या शालेय विभागामार्फत घ्याव्यात असा प्रस्ताव कला संचालकांनी सरकारकडे दिला असून त्यालाही संघाचा विरोध आहे असे संजय सोनवणे यांनी सांगितले.