लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कलादिग्दर्शक राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या आणखी एका साथीदाराविरुद्ध वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोलानाथ सोनी (रा. मुंबई) असे त्याचे नाव आहे.
यापूर्वी या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चंदन रामकृष्ण ठाकरे (वय ३६, रा. मुंबई) आणि नरेश बाबूराम विश्वकर्मा (वय ३९, रा. पालघर) या आरोपींची पोलीस कोठडी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी १४ जुलैपर्यंत वाढवली आहे. या दोघांसह चार जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साप्ते यांच्या पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनी याच्याविरोधात मालवणी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी न्यायालयात दिली.
आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. आरोपींनी आपापसात कट रचून साप्ते यांच्याप्रमाणेच चित्रपटसृष्टीतील अन्य कलादिग्दर्शक, निर्मात्यांना काम बंद पाडण्याच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून खंडणी स्वरुपात रकमा उकळल्या असून, त्याबाबत तपास करायचा आहे. साप्ते यांनी आरोपी विश्वकर्मा याचे काम बंद करून दुस-याला दिले होते. त्यामुळे आरोपीने अन्य साथीदारांसोबत संगनमताने कट रचून साप्ते यांच्याविरुद्ध युनियनमध्ये कामगारांचे पैसे न दिल्याच्या तक्रारी असल्याचे सांगून साप्ते यांना आॅफिसमध्ये बोलविणे, त्यांच्या सेटवर स्वत: किंवा हस्तकाला पाठवून काम बंद पाडणे, धमक्या देऊन खंडणी वसूल करणे, असा आर्थिक व मानसिक त्रास दिला असून, या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
दरम्यान, चंदन ठाकरे याच्या घराच्या झडतीत व्यवसायासंदर्भातील कागदपत्रे, वेगवेगळ्या पाच बँक खात्याचे पासबुक, चेकबुक आढळले आहे, तसेच आरोपी विश्वकर्मा याच्या घराच्या झडतीत फिल्म स्टुडिओ सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियन कमिटीचा सदस्य असलेले कार्ड मिळाले आहे. विश्वकर्मा याने साप्ते यांना युनियनला पैसे द्यावे लागतील, असे सांगून अन्य आरोपींसोबत भेट घालून दिली होती, असे पोलीस तपासात समोर आल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.
----------------