कोणी गायनात तर, कोणी पियोनो वादनात मन रमताहेत
पुणे : वर्षाचे १२ महिने पोलीस यंत्रणेवर कुठल्या ना कुठल्या कारणाने ताण तणावाला सामोरे जावे लागते. सततचा बंदोबस्त आणि समाजात वावरताना सततचा तणाव घेऊन त्यांना जगावे लागते. या तणावातही काही पोलीस अधिकारी, कर्मचारी वेगळा वेळ काढून आपले छंद जोपासत असतात. छंदातूनच त्यांना काम करण्याची नवी उर्जा मिळते.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गामुळे रस्त्यावर बंदोबस्त करताना पोलिसांसमोर आणखीच वेगळ्या समस्या उभ्या राहिल्या. अशावेळी आपल्या छंदातून या तणावापासून जीवन सुसाह्या करणार्या काही पोलीस कर्मचार्यांशी संवाद साधला.
वर्दीतील तरुणाची रांगडी प्रेम कहाणी
सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार किरण साबळे हे गीत लेखनात आपले मन रमवित असतात. गतवर्षी व या वर्षी गणवेश, रकमी, विहिरीची गोष्ट, आटलेलं पाणी इत्यादी ग्रामीण कथा त्यांनी प्रतिलिपीवर प्रकाशित केल्या. त्यांचे मित्र दिग्दर्शक समीर वंजारी व निर्माते संदीप काळे यांनी सुचविलेल्या अभिनयाच्या कल्पनेला मुहूर्त रुप देत नुकतेच एक ग्रामीण भागातील रांगड्या प्रेमाच्या भावना दाखविणारे ‘सोन्याची लंका’ हे मराठी प्रेमगीत बनवले आहे. सोशल मिडियावर या गाण्याची चांगलीच चर्चा असून वर्दीतील माणसाच्या सुमधुर प्रेम कहाणीने रसिकांना भुरळ पाडली आहे.
....
पियानो वादनाचा छंदातून मिळवताहेत उर्जा
आपल्याला एखादे तरी वाद्य वाजवता यावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते़ पण काही जणांनाच ते शक्य होते. सहायक पोलीस निरीक्षक सूर्यकांत साबळे यांनी पोलीस दलातील नोकरी संभाळून ५ ते ६ महिने नियमितपणे क्लासला जाऊन पियानो वादनाचे धडे घेतले. आता ड्युटीवरुन आल्यावर घरी पियानो वादनाचा सराव करीत असतात. त्यांना मुले व पत्नींची साथ मिळत आहे. पियानोवर नवनवीन गाणी वाजविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यातून दिवसभराच्या तणावातून मुक्त झाल्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यांना चित्रकलेचीही आवड आहे.
..........
पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी दिले प्रोत्साहन
महाविद्यालयीन जीवनात अनेकांना कविता, लघुकथा, ललित लेख याविषयी रुची असते. पण पुढे त्यात खंड पडतो. विशेष शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजीव देवकर यांनाही लेखनात रुची होती. ते हिंदीतून कविता करीत असत. मीरा बोरवणकर या पोलीस आयुक्त असताना त्यांनी या हिंदी कविता वाचल्या व त्यांना तुम्ही मराठीतून कविता करा, असे सुचविले. त्यानंतर ते मराठीतून कविता करु लागले. पिंपरी चिंचवड येथील कवी संमेलनात त्यांनी सहभाग घेतला होता. दिवाळी अंक, दक्षता मासिकांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. कवितांबरोबरच चित्रपट संगीताचे रसग्रहण करण्याचा त्यांना छंद आहे. यासाठी ते ड्युटीवरुन घरी आल्यावर रात्री २ वाजेपर्यंत जागून आपला छंद जोपासत असतात.
..........
गायनातून जिंदगीची सफर सुहाना बनविणारे
आपण रंगमंचावर गाणे गावे अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. पण प्रत्येकालाच ते जमते असे नाही. पण ही कला उत्तमनगर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार असलेले किरण देशमुख यांनी ती आत्मसात केली आहे. एका मित्राच्या लग्नात ‘करावके’ गायनाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी त्यांनी प्रथम प्रयत्न केला. आपल्याला हे जमतेय. हे त्यांना प्रथम लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्यात प्रयत्नपूर्वक लक्ष घालून ही कला आत्मसात केली. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी आपल्या या कलेचा उपयोग करुन त्यांनी अनेक माहिती संदेश यु टयुबवर प्रसारित केले होते.