पुणे : डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस व अन्य कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असताना प्रत्येकाला सतत ताणतणाव येत असतो. या तणावातून मुक्त होण्यासाठी प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासली पाहिजे; त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहाल, असे मत दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केले.बालगंधर्व रंगमंदिर येथे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्त कार्यालय पुणे च्या वतीने आयोजित राजस्व कला महोत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे आयकर विभाग आयुक्त प्रमुख विनोदानंद झा, शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे, चेअरमन मिलिंद गवई, कमिशनर राजीव कपूर, एन. श्रीधर, के . पी सिंग आदी उपस्थित होते. या महोत्सवात कलाकारांनी तेरा निरनिराळ्या कला सादर करून दाखवल्या. पटेल म्हणाले, कुठल्याही क्षेत्राचा कलेशी संबंध नसतो; पण भारतीय कला, नृत्य हे आपल्या संस्कृतीचे वेगळेपण आहे. त्यामुळे आपले मन प्रसन्न आणि शांत राहते. आयकर विभागातील आॅफिसर अशा कलेला आणि संस्कृतीला जोपासतात आणि अशा प्रकारच्या कला महोत्सवाचे आयोजन करतात ही कौतुकाची गोष्ट आहे. विनोदानंद झा म्हणाले, आयकर विभागातील आॅफिसर चेहº्यावरून फारच कडक स्वभावाचे असतात आणि त्यांच्यासमोर जायला पण भीती वाटते. पण असे असतानाही त्यांना अशा कला सादर करताना पाहून खूप आश्चर्य वाटत आहे. संगीत, कला, संस्कृती या मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहे. आयकर विभागातील प्रत्येक आॅफिसर, कमिशनर हे मनापासून काम करत असतात तेव्हा त्यांना अनेक अडथळे आणि तणाव याला सामोरे जावे लागते. संगीत, कला, आणि नृत्य या कलेमुळे ते जीवनातील थोडा वेळ रममाण होऊ शकतात.
सर्व ठिकाणी कलेला खूपच महत्त्व आहे. कुठल्याही कलेत यशाचा विचार न करता सर्वांसमोर उत्तम सादरीकरण कसे होईल, हे पहिले पाहिजे. जीवनात आनंद फक्त कलेमुळे येतो, नाही तर त्याशिवाय मानवी जीवन हे पशुसमान आहे. प्रत्येक व्यक्ती कलाकार नसते; पण एक संवेदनशील प्रेक्षक असतो. आता कलाकाराने कलेला व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहावे. - प्रभा अत्रे