लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: रागाचे आरोह आणि अवरोह दिले की, एक बंदिश (एक संगीत रचना) तयार होते आणि पारंपारिक शास्त्रीय शैलीमध्ये त्याचे प्रस्तुतीकरण होते. तसेच आपण तालाचे नाव आणि मात्रांची संख्या दिल्यास त्यानुसार तालाची रचना होते आणि दहा ते पंधरा मिनिटांचा तबला सोलो सादर होतो. हे नक्की काय आहे? असा प्रश्न पडला असेल ना! पुण्याचे फ्लेम युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक डॉ. विनोद विद्वांस यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर करून संगणकीय भारतीय संगीत आणि ताल निर्मिती करणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. एक आर्टिफिशियल इंटेलिजेंट क्रिएटिव्ह एक्सपर्ट सिस्टीम तयार होण्याचे काम संगीत विश्वातच नव्हे तर संगणक क्षेत्रातही प्रथमच होत आहे.
प्राध्यापक डॉ. विनोद विद्वांस यांनी पवई आयआयटीमधून पीचडी मिळविली असून, तेथील इंडस्ट्रीयल डिझाईन सेंटरचे माजी विद्यार्थी आहेत. जवळपास पंचवीस वर्षं ते या संकल्पनेवर काम करत आहेत. या संशोधनातूनच त्यांनी भरतमुनींची २२ श्रुतींची संकल्पना मांडणारे भरतवीणा नावाचे स्वतंत्र वाद्य डिझाइन केले आहे. या भरतवीणेवर भरतमुनींच्या २२ श्रुती वाजवता येतात. या आर्टिफिशियल इंटेलिजेंट क्रिएटिव्ह एक्सपर्ट सिस्टीम बद्दल डॉ. विद्वांस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितलं की, संशोधनात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरुन ‘संगणक-निर्मित’ भारतीय संगीत किंवा संगणकीय भारतीय संगीत आणि ताल निर्माण होतात का ही शक्यता ताडून बघितली आहे, आणि त्याचे फलित खूपच आश्वासक आहे. या सॉफ्टवेअरमध्ये कोणतीही मानवी मदत न घेता, रागाचे आरोह-अवरोह दिले की संगणक नवीन बंदिश तयार करतो. यामध्ये कुठलाही रागाचा किंवा तालाचा डेटाबेस नाही. यामध्ये हिंदुस्थानी तसेच कर्नाटक संगीतातील राग आणि ताल वाजतात. ही निर्मिती नुकतीच इंडिया इंटर नँशनल सायन्स फेस्टिव्हल (आयआयएसएफ२०२०) महोत्सवामध्ये सादर करण्यात आली.
----------------
तज्ज्ञांप्रमाणे करते काम
ही शास्त्रीय प्रणाली भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील एखाद्या तज्ज्ञाप्रमाणे काम करते. भारतीय संगीताची मूलतत्त्वे, संकल्पना आणि पारंपारिक ज्ञान या प्रणालीमध्ये संगीत निर्मितीसाठी नियमांच्या रुपात एन्कोड केले गेले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे हे ‘जनरेटिव्ह’ सामर्थ्य असल्याचे विद्वांस यांनी सांगितले.