पुणे - महाराष्ट्रात या वर्षी कमी पावसाची शक्यता असल्याचा अहवाल सॅसकॉफचा अंदाज आहे़ आताच दुष्काळाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रात या मॉन्सूनमध्येही पाऊस कमी झाला, तर मोठी बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे कृत्रिम पावसासाठी आतापासून राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले तर प्रत्यक्ष पावसाळ्यात त्याचा फायदा होऊ शकेल़साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम (सॅसकॉफ) यांची काठमांडु येथे नुकतीच परिषद झाली़ त्यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील पश्चिम किनारा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याचा काही भाग येथे सरासरीपेक्षा जवळपास ४० टक्के कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे़क्लायपॅक संस्थेने केलेल्या अभ्यासात ढगांमधील बाष्पकण एकत्र करण्यासाठी कृत्रिम प्रयत्न केल्यास जास्त पाऊस मिळू शकतो़ याबाबत क्लायपॅकचे प्रकल्प संचालक डॉ़ जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, या प्रकल्पावर आम्ही ३ वर्षे अभ्यास केला़ ढगांचे निरीक्षण करून पाऊस कमी पडतो, याचे निरीक्षण नोंदविले़ २०१७मध्ये कर्नाटक सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविला होता़ त्याला आम्ही मार्गदर्शन केले होते़ कर्नाटकमध्ये दर ५ किमीवर पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत़ वर्षाधारे या प्रकल्पात ढगांवर फवारणी केली़ त्यानंतर पुढच्या १५ मिनिटांत ते ढग गेले त्या ठिकाणच्या पावसात वाढ झाल्याचे दिसले़ मात्र ज्या ढगांवर फवारणी केली नाही़ त्यातून मिळालेला पाऊस याची तुलना केली तर त्यात २९ टक्के वाढ दिसली.
कृत्रिम पावसासाठी आतापासून प्रयत्न गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 5:45 AM