पुणे : उन्हाळा सुरु झाला नाही तर राज्यातील बहुतांश शहरांचा पारा 40 अंशाच्या वर गेल्याचे चित्र अाहे. काही ठिकाणी टॅंकरच्या फेऱ्यांना अाता सुरुवात झाली अाहे. उन्हाच्या कडाक्याचा फटका मानवांबराेबरच अाता पक्ष्यांनाही बसत अाहे. यासाठी अाता पुण्यातील पक्षीमित्रांनी पुढाकार घेतला असून पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याची 'जिथे घर, तिथे कृत्रिम पक्षी पाणवठा' ही माेहिम हाती घेतली अाहे. कात्रज येथे राहणाऱ्या प्रा. याेगेश हांडगे व त्यांच्या मित्रांनी ही माेहिम हाती घेतली अाहे. उन्हाचा जास्त फटका पक्ष्यांना बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी हाेते. त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकून गंभीर जखमी हाेणे असे प्रकार पाहायला मिळत अाहेत. पाण्याअभावी तडफडून मरणाऱ्या पक्ष्यांची संख्याही वाढत अाहे. त्यामुळे याेगेश अाणि त्यांचे मित्र एकत्र येत या पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठा तयार करण्याचा विडा त्यांनी उचलला. तसेच जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचारही या तरुणांकडून करण्यात येत अाहेत. याबाबत बाेलताना याेगेश म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून पक्ष्यांसाठी घराच्या छतावर तसेच परिसरामध्ये पाणवठे तयार करण्याचे काम करीत अाहे. सध्या चिमण्या, बुलबुल, काेकीळ, पारवे, कावळे यांसारखे पक्षी उष्माघाताचे बळी पडत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पाण्याची साेय करणे अावश्यक अाहे. शहरांमध्ये चिमण्या सुद्धा अाता दुर्मिळ हाेत चालल्या अाहेत. पक्ष्यांचे अस्तित्व धाेक्यात अाल्यास अापण अापल्या पुढच्या पिढींना या पक्ष्यांची माहिती कशी देणार असा प्रश्न अाहे. त्यामुळे प्रत्येकाने अापल्या घराच्या जवळ पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठा तयार करायला हवा. त्याचबराेबर शक्य असल्यास पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करण्याचा प्रयत्न करावा.
नागरिकांना पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात या सुविधा करता येतील- घरावर व बागांमध्ये मातीची उथळ भांडी पाणी भरुन ठेवावीत. तसेच शक्यताे हि पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत- शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा- घराजवळील पक्ष्यांची घरटी ताेडू नका- पाण्याचे भांडे खाेलगट नव्हे तर पसरट असावं- शक्य झाल्यास पक्ष्यांच्या खान्याचीही साेय करावी.