इंदापूर : शेती महामंडळाकडून सुमारे सातशे एकर जमीन कसण्यासाठी घेतलेल्या धनदांडग्या इसमाने नैसर्गिक ओढ्यावर अतिक्रमण करून पाणी बळकावल्याने आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अंथुर्णे गावातील हजारो एकर शेतीचा घास मानवनिर्मित दुष्काळाने घेतला असल्याचे चित्र आहे.अंथुर्णे गावाच्या पश्चिमेला असणाऱ्या व जंक्शन ते निमसाखर एवढ्या दीर्घ लांबीच्या या ओढ्यात नीरा डावा कालव्याच्या पाझराद्वारे पाणी येते. पाण्याचा उपयोग अंथुर्णे गावठाणातील सार्वजनिक पाणी पुरवठ्याचे दोन आड, ६० ते ६२ हातपंप, शिंदेमळा, वाघवस्ती, भुजबळवस्ती, साबळेवस्ती, दळवीवस्ती व रणगाव या गावातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी होतो. पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेंतर्गत या ओढ्यात विंधनविहिरी घेण्यात आल्या आहेत. मात्र काही काळापूर्वी अमोल पोरवाल या धनदांडग्या इसमाने शेती करण्यासाठी शेती महामंडळाकडून कराराने सातशे एकर शेतजमीन घेतली आहे. त्या जमिनीवर उसाची लागवड केली आहे. या नगदी व जादा पाण्याची आवश्यकता असणाऱ्या पिकाच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी सदर इसमाने ओढ्यालगत मोठी विहीर खोदली आहे. या विहिरीमध्ये त्याने विनापरवाना ओढ्याचे पाणी ओढून, ते चार विद्युत मोटारींद्वारे विहिरीच्या पुढे बनवलेल्या शेततळ्यात सोडले आहे.या प्रकारामुळे गावातील दोन्ही सार्वजनिक आड कोरडे पडले आहेत. साठ हातपंपांपैकी वीस चालू आहेत. जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोरवाल यांनी ओढ्यात टाकलेला पाईप काढून टाकण्याचा ग्रामस्थांचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दोन वेळा फसला आहे. मात्र पाण्याचा प्रश्न जास्तच बिकट झाल्याने, या भागातील शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत. (वार्ताहर)
अंथुर्णे गावात कृत्रिम पाणीटंचाई
By admin | Published: April 28, 2017 5:48 AM