पुणे : पैशांच्या जोरावर प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडले तरी ते कायमस्वरूपी टिकतेचं असे नाही. मात्र कलेच्या जोरावर सच्चा कलाकारासाठी याच सर्व गोष्टी हात जोडून उभ्या राहतात. याचेच चालते बोलते उदाहरण म्हणजे आशा मालपेकर. खरं तर त्याचं नावही अनेकांना माहिती नाही, मात्र त्यांचा सिंहाचा वाटा असलेले बाजीराव-मस्तानी, पद्मावत, राजा शिवछत्रपती, मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी चित्रपट सर्वांना माहिती आहेत. त्यांचं कामही आपण सगळ्यांनी बघितलं आहे मात्र ते त्यांचं आहे हे कोणालाही माहिती नाही.
कारण आशा मालपेकर या स्पेशालिस्ट आहेत त्या साड्या नेसवण्यात. आयुष्यभर नृत्यांगना म्हणून नाटकात आणि निवडक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मालपेकर यांना संपूर्ण मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी 'आऊ' म्हणून ओळखले जाते. सुबोध भावे अभिनीत बालगंधर्व चित्रपटात त्यांनीच भावे यांना पैठणी नेसवली होती. तब्बल २७ मीटर लांब असणारी ही साडी नेसवण्यास त्यांना दीड तास लागायचा. नितीन देसाई यांच्या राजा शिवछत्रपती मालिकेपासून तयार झालेला त्यांचा हा प्रवास आता हिंदीतही पसरला आहे. दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, श्रद्धा कपूर, कंगना रानौत अशा अनेक अभिनेत्रींना त्यांनी ऐतिहासिक भूमिकांसाठी साड्या नेसवल्या आहेत. साडी कितीही मोठी असो ती चापून बसते आणि नेसणाऱ्याला सहजपणे वावरता येते हीच त्यांची वैशिष्ट्ये. त्यांनी नेसवलेल्या साड्यांमध्ये या अभिनेत्री नुसत्या वावरल्या नाहीत तर 'पिंगा' घालून नाचल्याचेही आपण बघितले आहे. गंमत म्हणजे याकरिता त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. फक्त एकदा फोटो बघून त्या तश्शीच साडी नेसवतात तीही काही मिनिटात.
या सगळ्या प्रवासाबद्दल त्या सांगतात, 'मी गेले अनेक वर्ष रंगभूमीवर वावरले. इथे माझ्या कलेला सन्मान आहे याचा आनंद आहे. इतक्या मराठी आणि हिंदी कलाकारांसोबत काम केलं पण प्रत्येकाने सन्मान दिला, आदर केला इतकंच नाही तर 'आऊ' म्हणत प्रेम दिल याचा आनंद आहे. साडी नेसवणं नक्कीच सोपं नाही पण परमेश्वराच्या देणगीमुळे जमतंय मला. आज भूमिकांवर, कपड्यांवर, साडीच्या ठेवणीवर प्रचंड विचार केला जातो आणि त्यात मला काम करता येत याच समाधान आहे. आज माझं वय ८० पेक्षा अधिक आहे. अजून अनेकांना कलाकारांसोबत काम करायचं आहे. कलाकाराचा प्रवास अविरतपणे सुरु असतो, ज्या दिवशी तो स्थिरावतो त्या दिवशी कला लयास लागते. त्यामुळेच सदाबहार 'आशा मालपेकर उर्फ आऊ' यांना आपला प्रवास पुढे सुरूच ठेवण्याची इच्छा आहे.
आशा मालपेकर यांच्या कामातील काही महत्वाचे टप्पे :
- बालगंधर्व भूमिकेसाठी भावे यांच्या साडीला यायच्या ५० निऱ्या, साडी नेसवण्यास लागायचा दीड तास
- बाजीराव मस्तानी चित्रपटातील प्रियांका चोप्रा यांची साडी १२ मीटर लांब, पारदर्शी कापडाची साडी नेसवण्याचे आव्हान लीलया पेलले.
- शिल्पा शेट्टी, रणवीर सिंग (बाजीराव ) यांच्यासाठीही केले काम.
- नुकत्याच सोनाली कुलकर्णी अभिनीत हिरकणी चित्रपटासाठी केले काम.
- मनकर्णिका चित्रपटासाठी कंगना रानौत हिला भरजरी आणि भरगच्च साड्या नेसवल्या. त्यात तिचे काही लढाईचे प्रसंग असल्यामुळे साडी अजिबात सरकणार नाही अशी पद्धत वापरली.