नम्रता फडणीस / पुणेतुम्ही उच्च शिक्षण घेतल्यानंतरच त्या विषयामध्ये पारंगत होऊ शकता, अशी एक शैक्षणिक आकलनाची परिपक्व चौकट मांडली जाते. मात्र, या पारंपरिक कक्षेबाहेरचे क्षितिज व्यापून कथा-दिग्दर्शक विश्वास रांजणे यांनी शिक्षणाच्या साचेबद्ध चौकटीलाच छेद दिला आहे. दहावी नापास. कलात्मकेचे कोणतेही अधिकृत शिक्षण घेतलेले नाही. तरीही शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या ‘जाणीव’ या लघुपटाद्वारे प्रबोधनाच्या प्रवाहात त्यांनी उडी घेतली. शासनाकडून हा लघुपट शाळांमध्ये दाखविण्याचा अध्यादेशही निघाला, हेच त्यांच्या निर्मितीचे यश! आता ‘झेंडा स्वाभिमानाचा’ या चित्रपटामधून आरक्षणापेक्षा शिक्षणातून सक्षमीकरणाकडे वाटचाल करा, याचे बीज समाजात रुजविण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला आहे.ते म्हणाले, ‘‘पैशाचे अवमूल्यन आणि नात्याची विस्कटलेली घडी, यावर लघुपटाची कथा केंद्रित करण्यात आली. ज्ञान, मनोरंजन, कला, शिक्षण संस्कार आणि संस्कृतीचा मौल्यवान ठेवा या लघुपटातून जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’’ या लघुपटाने अनेक मुलांच्या मानसिकतेतही परिवर्तन घडले आहे. मात्र, एवढ्यावरच न थांबता ‘शिक्षणा’चे महत्त्व तळागाळात रुजविण्यासाठी ‘झेंडा स्वाभिमानाचा’ हा चित्रपट निर्माण करण्यात आला आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण कमी पडत आहे. जिजाऊ जन्माला आल्या नाहीत तर छत्रपती शिवाजीमहाराज तरी कसे घडतील, याकडे लक्ष वेधण्याबरोबरच ‘शिका आणि सक्षम व्हा’ हा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे. स्वाभिमान आणि सन्मानाने जगायला लावणारा, असा हा चित्रपट आहे.
शिक्षणाबाबत कलात्मक ‘जाणीव’
By admin | Published: January 25, 2017 2:21 AM