पुणे : नाटक, चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध नाही... केवळ वडिल शाहीर होते इतकाच काय तो कलेशी संबंध. परंतु दारात मदतीसाठी आलेल्या एकाही कलाकाराला परत न पाठविणे असा त्यांचा स्थायीभाव. प्रसिद्धीच्या फारसे मागे नसल्याने समाजाला त्यांचे नाव तितकेसे माहित नाही. मात्र पडद्यामागे राहून कलाकारांना सहकार्याचा हात देत आपल्या दानशूर वृत्तीचे दर्शन ते घडवित आहेत. एकीकडे शासनाने कलाकारांना पोरकं केलेले असताना ‘ते’ मात्र कलाकारांचे ‘मसीहा’ बनले आहेत. श्रद्धानंद भोसले असे त्यांचे नाव. मूळ गाव सातारा. वडिल हरिश्चंद्र सीताराम भोसले हे शाहीर होते. मुंबईमधून पदवी घेतल्यानंतर ते हॉटेलच्या व्यवसायात शिरले आणि त्यांनी परदेशामध्ये आपले चांगले बस्तान बसविले. ऑस्ट्रेलिया तसेच बंगळुरूमध्ये हॉटेल बिझनेस आणि सॉफ्टवेअर कंपनीचा त्यांचा व्यवसाय आहे. वडिलांमुळे कलाकारांशी त्यांचा जवळून संबंध आला. कलाकारांचे प्रश्न त्यांनी जवळून पाहिले असल्याने त्यांनी कलाकारांना मदतीचा हात दिला. मुंबईतच त्यांनी बूम कलाकार नावाची संस्था स्थापन केली. कलाकाराने त्यांच्याकडे मदतीची याचना केली तर ते त्या कलाकाराला परत पाठवित नाहीत, अशी त्यांची ओळख आहे. आजवर जवळपास १०० ते १५० कलाकारांना त्यांनी दोन लाखापर्यंतची मदत केली आहे. त्यांच्या संस्थेकडे नोंदणी केलेल्या प्रत्येक ज्येष्ठ कलाकाराला ते ७०० रूपयांची रक्कम खिशातून देतात. या दानशूर दात्याशी ‘लोकमत’प्रतिनिधीने संवाद साधला. ते म्हणाले, ज्या कलाकारांनी अनेक वर्षे रंगभूमीची सेवा केली, ते कलाकार आज विपन्नावस्थेत जगत आहे. कलाकारांच्या मदतीसाठी अनेकदा शासनाच्या काही व्यक्तींशी बोलणी केली मात्र प्रतिसाद शून्य मिळाला. मग स्वत: हूनच पुढाकार घेतला. त्यांना सहकार्य करणे हे आपले उत्तरदायित्व आहे असे वाटले. काम मिळत नसल्याने अनेक कलाकार व्यसनाच्या विळख्यात अडकले. या व्यसनापायी अनेकांची जीवनयात्रा संपली. त्यांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी पनवेल येथे लवकरच मेडिटेशन सेंटर सुरू करणार आहे. त्याप्रमाणे कलाकारांना काही रक्कम मानधन म्हणून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेला श्रद्धानंद भोसले यांनी ५० हजार रूपयांचा धनादेश दिला. परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी तो धनादेश स्वीकारला.
कलाकारांचा ‘मसीहा’; पडद्यामागे राहून सहकार्याचा हात देत घडवित आहेत दानशूर वृत्तीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:28 PM
एकीकडे शासनाने कलाकारांना पोरकं केलेले असताना ‘ते’ मात्र कलाकारांचे ‘मसीहा’ बनले आहेत. श्रद्धानंद भोसले असे त्यांचे नाव. मूळ गाव सातारा.
ठळक मुद्देआजवर जवळपास १०० ते १५० कलाकारांना त्यांनी केली दोन लाखापर्यंतची मदत अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेला भोसले यांनी दिला ५० हजार रूपयांचा धनादेश