कमाईअभावी कलाकार, संगीत शिक्षकांची आबाळ
वर्षभरापासून आर्थिक संकट : सरकारकडून मदतीची अपेक्षा
पुणे : संगीताच्या माध्यमातून श्रोत्यांना अवर्णनीय आनंद देणारे संगीत कलाकार, संगीत शिक्षक कोरोना संकटकाळात आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कार्यक्रम होत नसल्याने कलाकारांची कमाई शून्यावर आली आहे. तर संगीत शिक्षकांना विद्यार्थी मिळत नाहीत. त्यामुळे पुण्यातील हजारो कलाकार, संगीत शिक्षकांवर कमाईसाठी दुसरा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे.
व्हायोलिन वादन शिकवणारे संगीत शिक्षक म्हणाले की, पूर्वी सर्वत्र कार्यक्रम होत असल्याने जगण्यासाठी आवश्यक पैसे मिळत होते. तसेच, क्लासच्या माध्यमातूनही संसाराला हातभार लागत होता. मात्र, कोरोनाचे संकट, लॉकडाऊनमुळे वर्षभरापासून कोठेही संगीत कार्यक्रम झालेले नाहीत. त्यामुळे या काळातील बिदागी बुडाली. कोरोनामुळे व्हायोलीन, हार्मोनियम शिकायला येणा-या विद्यार्थ्यांचाही क्लास बंद झाला. त्यामुळे नुकसानीत भरच पडली. अंध कलाकार असल्यामुळे काही सामाजिक संस्थांनी मदत केली. मात्र, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्नाचा निश्चित स्रोत आवश्यक आहे. त्यामुळे हातावर पोट असणा-या कलाकारांचे जगणेच कठीण झाले आहे.
गायन शिकवणारे शिक्षक म्हणाले की, सादरीकरण केले तरच पैसे मिळतात असे अनेक कलाकार पुण्यात आहेत. लॉकडाऊन, कोरोनाचा सर्वाधिक फटका त्यांना बसला आहे. शिकवण्या नसल्याने अडचण झाली आहे. त्यामुळे अनेक कलाकार भाजीविक्री, फूड डिलिव्हरी अशी कामे करून दिवस काढत आहेत. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला जोडधंदा करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. संगीत क्लास घेणा-या शिक्षकांसाठी सरकारने काहीतरी मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
चौकट---
आॅनलाइन संगीत शिक्षणाला मर्यादा
सध्याच्या काळात आॅनलाइन संगीत क्लास ही संकल्पना शक्य असली तरी त्याला तांत्रिक मर्यादा आहेत. व्हायोलिन, तबला, सरोद, सतार या वाद्यांचे ट्युनिंग लागते. ते सर्वच विद्यार्थ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे आॅनलाइन संगीत शिक्षणाला दहापैकी एकाच विद्यार्थ्याची पसंती मिळत आहे. अॅपमध्येही तांत्रिक दोष असल्यामुळे आॅनलाइन संगीत शिक्षण अडचणीचे ठरत आहे.
कोट - --
जगण्याच्या प्राधान्य क्रमात संगीत सगळ्यात शेवटच्या स्थानावर आहे. पूर्वी कलाकारांना राजाश्रय मिळत होता. आता सरकार कलाकारांसाठी काहीही करत नाही. हात-पाय व्यवस्थित असलेल्या कलाकारांना इतर पर्याय आहेत. मात्र, दिव्यांग कलाकारांचे या काळात खूप हाल सुरू आहेत. त्यामुळे सरकारने अशा कलाकारांचा प्राधान्याने विचार करावा.
- सुधाकर चव्हाण, शास्त्रीय गायक
वर्षभरापासून सर्व काम बंद आहे. कुठेही कार्यक्रम होत नसल्यामुळे आतापर्यंत खूप नुकसान झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकारकडून मदतीची अपेक्षा नाही. मात्र, हे सर्वच आव्हानात्मक आहे.
- शीतल हुंडेकर, व्हायोलिन शिक्षिका
फोटो - सुधाकर चव्हाण
शीतल हुंडेकर