पुणे : कलाकार कलेतून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, मनातील भावना कलाकारांनी सर्वप्रथम स्वत: जगायला पाहिजे. कवी, कादंबरीकार दुसऱ्यांना कसे जगावे हे सांगतात. परंतु, कलाकारांनी स्वत: जगून मग दुसऱ्यांना तसे जगायला सांगायला हवे’, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
स्टारविन्स ग्रुप यांच्या वतीने बालगंधर्व कलादालन येथे स्टारविन्स आर्ट फेस्टिवलचे आयोजन केले होते. या वेळी स्टारविन्स ग्रुपचे प्रणव तावरे, स्वरदा देवधर, प्रथमेश खारगे, राज लोखंडे, मिहीका अजिथ उपस्थित होते.
सयाजी शिंदे म्हणाले, ‘आपल्याला झाडांपासूनच अन्न मिळते. परंतु, आपण त्यांच्यासाठी काहीच करत नाही. घरातील सामान, दागिने, गाड्या घेताना ब्रँडचा विचार करतो. परंतु जगण्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या हवा, पाणी, निसर्ग याकडे लक्ष देत नाही. आपण शक्य तितके निसर्गाच्या जवळ जायला हवे.’