पुणे : राष्ट्रपतींच्याच हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळावा ही स्वाभाविक भावना आहे. मात्र, राष्ट्रपतींना आज जमत नसेल तर तो कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती कलाकारांनी करावी. मंत्र्याच्या हस्ते हा पुरस्कार घेणार नाही हे म्हणणे योग्य नाही. कलाकारांनी कुठला हटट कुठेही करू नये, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कलाकारांना फटकारले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत करण्याची परंपरा आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या हस्ते अकराच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उर्वरित पुरस्कार हे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहे. यामुळे राष्ट्रीय पुरस्कारावर आपल्या कलेची मोहर उमटविणा-या कलाकारांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता हा निर्णय घेण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आपले म्हणणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारांनी आपल्या स्वाक्षरीचे पत्रही दिले. यानंतरही शासनाकडून या निर्णयात कोणताही बदल करण्यात न आल्याने ६८ कलाकारांनी पुरस्कार सोहळयावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात गोखले यांना विचारले असता त्यांनी कलाकारांच्या भूमिकेवरच आक्षेप नोंदविला. ते म्हणाले, राष्ट्रपती भवनाकडून सरकारी नियमाप्रमाणे एक तास राष्ट्रपती येतील आणि अकरा पुरस्कार देऊन जातील आधी सांगितले असेल तर मंत्र्यांकडून पुरस्कार घेणार नाही असे म्हणणे दुर्दैव आहे . जर असे झाले असते की संपूर्ण कार्यक्रमाला मी हजर राहाणार आहे आणि मग जाहीर करण्यात आले की ते उपस्थित राहणार नाहीत, तर हा रूसवा-फुगवा ठीक आहे. आधी सांगितले आहे एक तासासाठीच येणार आहे तर यात काही गैर नाही. यापूर्वी कधी असे घडले नाही पण राष्ट्रपतींना दुसरी काही काम असतात की नाही? आपण समजून घेतले पाहिजे. प्रोटोकॉल तो प्रोटोकॉल आहे. कोणीतरी पिल्लू सोडते. मग एकाने केला की दुसराही विरोध करतो. पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळावा ही स्वाभाविक भावना आहे. पण ते उपलब्ध नाहीत हे कळले असेल तर पुढच्या महिन्यात किंवा पंधरा दिवसांनी घ्या, त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा घ्या, अशी विनंती करता येऊ शकते ना, परंतु, मंत्र्यांच्या हस्ते घेणार नाही असे म्हणणे चुकीचे आहे, अशा शब्दात बहिष्कार टाकणा-या कलाकारांना गोखले यांनी फटकारले. दरम्यान, मनोज जोशी यांनी विषय माहिती नसल्याने याविषयी बोलण्यास नकार दिला.
कलाकारांनी कुठला हट्ट कुठेही करु नये: विक्रम गोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 6:26 PM
राष्ट्रपतींना दुसरी काही काम असतात की नाही? आपण समजून घेतले पाहिजे. प्रोटोकॉल तो प्रोटोकॉल आहे. कोणीतरी पिल्लू सोडते. मग एकाने केला की दुसराही विरोध करतो.
ठळक मुद्देमंत्र्यांच्या हस्ते घेणार नाही असे म्हणणे चुकीचेराष्ट्रपती पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळावा ही स्वाभाविक भावना