पुणे : आत्ममग्नता, स्वत:भोवती निर्माण झालेले वलय, सर्वसमावेशकतेचा अभाव, कलाक्षेत्राविषयी अनास्था यामुळे पुण्यातील चित्रकार, छायाचित्रकार, कलाकार मंडळी एकत्र येत नसल्याची चर्चा रंगत असते. वैयक्तिक प्रगती करताना, कलाक्षेत्राचा सर्वसामावेशक विचार करण्याच्या दृष्टीने पुण्यातील कलाकारांनी अनोखे अभियान साकारण्याचे ठरवले आहे. कलाकारांची अस्मिता जपणारी एकही संस्था पुण्यात मागील सत्तर वर्षात झालेली नव्हती. हेच लक्षात घेऊन बॉम्बे आर्ट सोसायटीच्या धर्तीवर पुणे आर्ट सोसायटीची स्थापना करण्यासाठी सर्वजण एकवटले आहेत. रसिकांमधील कलासाक्षरता वाढावी, यादृष्टीने कलाकारांच्या चमूतर्फे पहिला कला महोत्सवही आयोजित करण्यात आला आहे.वर्ष-दीड वर्षापूर्वी पुणे आर्ट सोसायटीची संकल्पना साकारण्यास सुरुवात झाली. काही कलाकारांनी एकत्र येऊन ‘आर्ट @ मी’ हा व्हॉटसअॅप ग्रूप तयार केला. दीड वर्षात महाराष्ट्रातील सुमारे ३०० कलाकार या ग्रूपच्या माध्यमातून एकत्र आले. फॉर्वर्डेड मेसेजवर बंदी घालत केवळ कला क्षेत्राशी संबंधित चर्चा, पोस्ट, आपले मत मांडण्याचे बंधन सर्वांनी घालून घेतले. कला शाखेच्या विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक कलाकारांपर्यंत सर्वांच्या सहभागाने कलेबाबत विचारमंथन सुरु झाले. व्हॉटसअॅप ग्रूपच्या माध्यमातून कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले. यातूनच ‘द पुणे आर्ट सोसायटी’ ची कल्पना पुढ आल्याचे कलाकार सुनील बलकवडे यांनी ‘लोकमत’शी बोलतना सांगितले. पुणे आर्ट फेस्टिवल या कार्यक्रमातून कलाकारांच्या या प्रयत्नाचा श्रीगणेशा होत आहे. सिनेमा, क्रिकेट, संगीत, साहित्याप्रमाणे रंगाचे भावविश्व रसिकांना श्रीमंत करेल, या भावनेतूनच सुमारे सव्वाशे कलाकार एकत्र येऊन रंगबेरंगी कलाकृतींचा खजिना रसिकांसाठी घेऊन येत आहेत. हा रंगांचा पहिला उत्सव १५, १६ आणि १७ एप्रिल रोजी बालगंधर्व कला दालनामध्ये साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ कलाकार सुधाकरण चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. यावेळी मान्यवर कलाकारांचे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. १६ एप्रिल रोजी बडोद्यातील कलाकार दीपक कन्नल ‘भारतातील कला चळवळ’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.--------------कलाकार वैयक्तिक कामातून कलेची साधना करत असतात. मात्र, कलेच्या क्षेत्रामधील विविध संधींचा एकत्रित अभ्यास करता यावा, विचारमंथन व्हावे, नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यादृष्टीने पुणे आर्ट सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीला शासनाकडून दर वर्षी अनुदान दिले जाते. पुणे आर्ट सोसायटीतर्फे पहिली दोन -तीन वर्षे भरीव काम करुन त्यानंतर शासनाशी संपर्क साधला जाणार आहे.- सुनील बलकवडे, कलाकार
कला साक्षरतेच्या समृद्धतेसाठी पुण्यातील कलाकार एकाच छताखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 6:36 PM
सिनेमा, क्रिकेट, संगीत, साहित्याप्रमाणे रंगाचे भावविश्व रसिकांना श्रीमंत करेल, या भावनेतूनच सुमारे सव्वाशे कलाकार एकत्र येऊन रंगबेरंगी कलाकृतींचा खजिना रसिकांसाठी घेऊन येत आहेत.
ठळक मुद्देपुणे आर्ट सोसायटीचा पुढाकार कलाकारांनी एकत्र येऊन ‘आर्ट @ मी’ व्हॉटसअॅप ग्रूपची निर्मिती, सुमारे ३०० कलाकार एकत्ररंगांचा पहिला उत्सव १५, १६ आणि १७ एप्रिल रोजी