लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कलाकारांनी हेवेदावे दूर ठेवून एकमेकांचे खुल्या दिलाने कौतुक करायला हवे; मात्र एकमेकांना प्रोत्साहन देण्याऐवजी कलाकार पाय खेचताना दिसतात. इतर कलाकारांनी नाटके पाहून त्यांचा हौसला वाढवण्याऐवजी उपहासात्मक टिपण्णी केली जाते. कलाकारांमधील मतभेदाचे हे चित्र बदलायला हवे. आपण सर्वश्रेष्ठ आहोत असे न समजता कलाकारांचे पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजेत, अशी अपेक्षा अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केली.बालगंधर्व रंगमंदिराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सौमित्र पोटे यांनी मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत घेतली. या वेळी अभिनयाची आवड, नाटक ते चित्रपट हा प्रवास, नाट्य परिषदेची वाटचाल, चित्रीकरणाच्या आठवणी याबाबत दिलखुलास संवाद साधला. जोशी म्हणाले, ‘माणसाकडे हुशारी नसली, तरी कला त्याला तारून नेते. मी बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावर बऱ्याच भूमिका साकारल्या. पुण्याचे रसिक चोखंदळ, क्रोधिष्ट आणि उत्स्फूर्तपणे दाद देणारे असतात, याची वेळोवेळी प्रचिती आली. माझ्या आजवरच्या प्रवासात ज्या भूमिका समोर आल्या, त्या मी प्रामाणिकपणे करीत गेलो. बऱ्याच कलाकारांना खूप मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही आणि संघर्ष करावा लागतो. त्यांच्याकडे पाहून मला स्वत:चा हेवा वाटतो. या संपूर्ण प्रवासात प्रेक्षकांचे आशीर्वाद कामी आले. मी कोणत्याही भूमिकेचा अथवा पटकथेचा आधीपासून अभ्यास करत नाही. उत्स्फूर्त अभिनयातील गंमत वेगळीच असते.’‘मोरूची मावशी’ या नाटकामध्ये साकारलेली मावशीची भूमिका कायम स्मरणात राहिल्याचे सांगत जोशी म्हणाले, ‘आजकाल बरेच कलाकार रंगमंचावर, पडद्यावर स्त्रीची भूमिका साकारतात. अशी भूमिका साकारताना ती तंतोतंत स्त्रीप्रमाणचे असली पाहिजे. ही तारेवरची कसरत करताना भूमिकेशी खेळ होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री पात्रातूनच मलाही प्रेरणा मिळाली.’नाटकाच्या तिकिटांचे दर वाढल्यामुळे प्रेक्षक नाटकापासून दुरावले आहेत, असे मोहन जोशी म्हणाले.
कलाकारांनी हेवेदावे दूर ठेवावेत
By admin | Published: June 29, 2017 3:37 AM