पुणे : कुख्यात गुंड अरूण गवळी यांची पत्नी आशा ऊर्फ मम्मी अरुण गवळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या प्रकरणात खेड न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.के.ब्रम्हे यांनी हा आदेश दिला आहे. पोलिसांच्या सुचनेनुसार पोलीस स्टेशनमध्ये हजेरी, पोलिसांना तपासात सहकार्य, तपासामध्ये ढवळाढवळ नाही, फिर्यादीवर दबाब टाकायचा नाही, न्यायालयाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडता येणार नाही, सध्याचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक तपास अधिका-यांना देणे,आदी अटीं व दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी ३० हजार रुपयांचा जातमुचलक्यावर न्यायालयाने हा जामीन मंजुर केला आहे. याबाबत चंदननगर येथील एका व्यापा-याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरज यादव (लोणी धामणी, ता. आंबेगाव), मोमीन मुजावर (रा. मुंबई) आणि बाळा पठारे (रा. वाघोली) आणि अन्य एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यादव, मुजावर आणि पठारे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १३ ते १६ एप्रिल या कालावधीत घडली. पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे चंदननगर व लोणी धामणी येथे दुकाने आहे. तेथे त्यांच्या भावाचेही कपड्याचे दुकान आहे. ही तिन्ही दुकाने व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे मोबाइलवरून ५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास दुकानाची मोडतोड करण्याची आणि जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात मम्मी यांनी अॅड. पी.बी. बिराजदार, अॅड. नितीन शिंदे, अॅड. सुरेश जाधव आणि अॅड. डी. एल. वाठोरे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सरपंच सावळा नाईक यांच्याकडून दीड लाख रुपये खंडणी घेतल्याप्रकरणी मंचर पोलिसात मम्मीसह दहा जणांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातही बचाव पक्षाच्या युक्तीवादानंतर मम्मीला अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला.
अरुण गवळीच्या पत्नीला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 9:33 PM
दुकाने व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांच्याकडे मोबाइलवरून ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
ठळक मुद्देअटीं व दोन्ही गुन्ह्यात प्रत्येकी ३० हजार रुपयां जातमुचलक्यावर न्यायालयाने हा जामीन मंजुर