पुणे : कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या पत्नी मम्मी ऊर्फ आशा गवळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे़. खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एऩ के़ ब्रम्हे यांनी हा आदेश दिला आहे़. पोलीस बोलावतील तेव्हा पोलीस स्टेशनला हजेरी द्यावी, तपासात सहकार्य करावे, पुराव्यामध्ये ढवळाढवळ करु नये, फिर्यादी, साथीदारांवर दबाब टाकू नये़ तपास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडू नये अशा अटींसह ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे़. दरम्यान, आशा गवळी यांच्यावर अशा प्रकारचा आणखी एक गुन्हा मंचर पोलीस ठाण्यात दाखल आहे़. त्यामध्येही त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे़. याप्रकरणात चंदननगर येथील एका व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे़. ही घटना १३ ते १६ एप्रिल या दरम्यान घडली होती़. त्यात सुरज यादव (रा़ लोणी धामणी, ता़ आंबेगाव), मोबीन मुजावर (रा़ मुंबई) आणि बाळा पठारे (रा़ वाघोली) यांना अटक करण्यात आली असून सध्या ते तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत़. फिर्यादी यांचे चंदननगर व लोणी धामणी येथे दुकान आहे़. तेथे त्यांच्या भावाचे कपड्याचे दुकान आहे़. या तिन्ही दुकाने व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती़. खंडणी न दिल्यास दुकानाची मोडतोड करण्याची व जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती़. याप्रकरणी आशा गवळी यांच्यावतीने अॅड़ पी़ बी़ बिराजदार, अॅड़ नितीन शिंदे, अॅड़ सुरेश जाधव आणि अॅड़ दर्शन वाठोरे यांनी काम पाहिले़ बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने गवळी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे़.
अरुण गवळींच्या पत्नी ‘मम्मी’ला अटकपूर्व जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 9:42 PM
कुख्यात गुंड अरुण गवळी यांच्या पत्नी मम्मी ऊर्फ आशा गवळी यांना खंडणीच्या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे़.
ठळक मुद्देदुकाने व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी त्यांच्याकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती़.