पुणे : पुणेशिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीत पहिल्याच फेरीत पहिल्या पसंतीची १६ हजार ८७४ मते मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांनी विजयाकडे आगेकुच केली आहे. तसेच पदवीधर मध्ये अरुण लाड यांनी पहिल्या फेरी अखेर २७ हजारांची मोठी आघाडी घेतली आहे.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची पहिल्या फेरीची मतमोजणी रात्री बाराच्या सुमारास संपली.त्यानंतर दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरु झाली. आता दुसऱ्या फेरीत ८ हजार २४० पहिल्या पसंतीची मते मिळवल्यास प्रा. आसगावकर सहजपणे विजयी होतील असे चित्र आहे. पहिल्या पसंती क्रमांकाच्या २५ हजार ११४ मतांचा कोटा पूर्ण केल्यास प्रा. आसगावकर यांना विजयी घोषित केले जाईल. मात्र हा निश्चित कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जातील. त्या स्थितीत पुणे शिक्षक मतदार संघातील निकाल जाहीर होण्यास शुक्रवारची (दि. ४) सकाळ उजडणार आहे.
पुणे शिक्षक मतदार संघात एकूण ३५ उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या पसंती क्रमांकात महाआघाडीच्या प्रा. आसगावकर यांनी आघाडी घेतली आहे. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपा पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार यांना पहिल्या पसंतीची ५ हजार ७९५ मते मिळाली. विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना पहिल्या फेरीतील ११ हजार २४ मते मिळाली आहेत.
तत्पुर्वी रात्री साडेअकरा वाजता शिक्षक मतदारसंघाचा पहिल्या पसंतीच्या मताचा कोटा निश्चित झाला. विजयासाठी एकूण वैध मते भागीले दोन अधिक एक मत, म्हणजेच २५ हजार ११४ मते मिळविणे आवश्यक आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक मतदार संघातील एकूण ५३ हजार १० मते मोजली गेली. यापैकी २ हजार ७८४ मते अवैध ठरली असून, ५० हजार २२६ मते वैध ठरली आहेत.
पदवीधरचा निकाल शुक्रवारी रात्रीजोरदार चुरस असलेल्या पदवीधर मतदारसंघातील पहिल्या पसंतीचा कोटा निश्चित होण्यासाठीच शुक्रवारी (दि. 4) पहाटेचे चार ते पाच वाजण्याची शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी वर्तवली. त्यामुळे निकालास शुक्रवारची संध्याकाळ किंवा रात्र उजाडू शकते असे सांगण्यात आले.