पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय साहित्य संमेलन २ आणि ३ डिसेंबर रोजी मंगळवेढा येथे होणार असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अरुण म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेच्या दामाजीनगर शाखेने या संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाचे उदघाटन शनिवार २ डिसेंबर रोजी आमदार समाधान आवताडे यांचे हस्ते होणार आहे.
संमेलनाध्यक्ष जेष्ठ कवी अरुण म्हात्रे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, निमंत्रक तानसेन जगताप, स्वागताध्यक्ष प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, संयोजक प्रकाश जडे, सोलापूर जिल्हा प्रतिनिधी जे. जे कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी, कल्याण शिंदे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
सकाळी दामाजीमंदिरापासून ग्रंथदिंडी निघणार असून ग्रंथदिंडीचे उदघाटन डाॅ. शरद शिर्के यांचे हस्ते होणार आहे. या संमेलनात दोन परिसंवाद होणार आहेत. "मराठी लेखक भूमिका का घेत नाहीत" ? या विषयावर डाॅ. श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यात डाॅ. श्रुती वडगबाळकर, डाॅ. अरुण शिंदे, प्रा.धनाजी चव्हाण आणि सुरेश पवार सहभागी होणार आहेत.
"समाजमाध्यमातील साहित्य-चिंता आणि चिंतन" या विषयावरील परिसंवादात दै. लोकमतचे संपादक संजय आवटे, अरविंद जोशी, राहुल कदम, डाॅ. शिवाजीराव शिंदे, कृष्णाजी कुलकर्णी सहभागी होणार आहेत. या संमेलनात दोन कविसंमेलने होणार असून, त्यात राज्यभरातले कवी सहभागी होणार आहेत. कथाकार बाबा परीट यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. प्रकाश जडे लिखित बाप लेकीच्या नात्यावर आधारित "वात्सल्यसूक्त" हा कार्यक्रम स्मिता जडे व अवंती पटवर्धन सादर करणार आहेत.